Sunday, November 24, 2024

/

शेख आडनावाचा मराठमोळा शाहीर ..व्यथा एका वादळाची

 belgaum

Logo amar shekhआजच्या जातीपातीच्या,धार्मिक द्वेषाच्या राजकारणात आणि सामाजिक जीवनात शेख आडनाव मराठी माणसाच्या जीवनातून जणू हद्दपारच झालाय. धार्मिक द्वेषाच्या या सामाजिक जीवनात याच शेख आडनावाच्या माणसानं मराठी माणसाचा आत्मा जिवंत केल्याचा इतिहास आजच्या या माणुसकी संपविण्याच्या आयुष्यात धूसर होत आहे . मराठी माणसाच्या रोजच्या आयुष्यात सहसा कधीच न येणारं हे नाव आजच्या पिढीच्या शालेय जीवनात सुद्धा कधी आले नाही. असे उपेक्षित नाव ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन आपल्या गगनभेदी आवाजांनी आणि डफाच्या थापांनी झंझावून सोडले.मुंबई पासून बेळगावच्या रस्त्यांवर ज्यांनी आपल उभं आयुष्य या लढ्यात झोकून दिले ते शेख आडनाव दुसरं तिसरं कुणाचं नाही तर शाहीर अमर शेख यांच .
शाहीर अमर शेख मुळात तुम्हा आम्हाला माहित असणार तरी कसे? आणि माहित नसले म्हणून बिघडलं कुठ ? त्यांच्यापासून आपल काय अडणार आहे ?अशीच आजच्या लोकांची भावना असणारं, यात काय शंका नाही.त्यांनी असं काय केलंय ? आणि ते आपल्याला माहित नाही म्हणून काय झालं ? या व अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला आणि तुमच्यासमोर मांडतोय. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवून देखील शाहीर मोठे होणार नाहीत, तर मोठे आहेतच . भलेही तुमच्या आमच्या नजरेत आज ते नसतील पण त्यांच मोठेपण आजही फ्लोरा फ़ॉऊनटनच्या सिग्नल वरच्या हुतात्मा स्मारकाच्या नजरेत उभे आहे. बेळगावच्या गल्लीमध्ये ते मुरलं आहे. फरक एवढाच कि काळाच्या ओघात तुम्हा आम्हाला ते आज दिसत नाही .किंबहुना आम्ही ते पाहण्याचा कधी प्रयत्नच केला नाही.
शाहीर अमर शेख , होय मुस्लीम , जन्माने का असेना पण मुस्लीम . सोलापूरच्या बार्शी मध्ये जन्म असणारे शाहीर अमर शेख कळायला लागल्यावर जे मुंबईत आले ते कायमचेच मुंबईकर झाले . धार्मिक युद्धात अडकलेल्या समाजात मुस्लीम माणूस मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय असू शकतो हे जरी आज कुणी मान्य करत नसला आणि नसाल तर ते सत्य आहे. तसाही आजच्या या जमान्यात शाहीर मंडळी, लोकांना क्वचितच माहित आहेत. कधितर चुकून कुठल्यातरी टीव्ही शो मध्ये झळकतात किंवा शिवजयंतीला त्यांची ऊठ बस होते . तेवढीच गरजेपुरती डिमांड राहिलेली ही मंडळी.असे असताना त्यात शाहीर अमर शेख लोकांना माहित असणे म्हणजे बालवाडीच्या मुलाला सगळी मुळाक्षर विचारल्यासारखे आहे. आणि म्हणूनच शाहीर अमर शेख यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाच्या निमित्ताने मला झालेली ओळख तुमच्याबरोबर सामायिक करतोय.
मुंबईच्या सात रस्त्यावर बैठ्या चाळीत त्यांनी आपल आयुष्य काढलं. त्याचं कार्य इतकं मोठं आहे कि तिथल्या रस्त्याला देखील त्याचं नाव दिले आहे .पण त्या नावाखेरीज आज त्यांच्या आठवणी जपणारं तिथे आज काहीच नाही. शाहिरांच घर जरी तिथे असलं तरी तिथे आज दुसरंच कुणीतरी राहतं. हजारो कोटीं खर्च करून महापुरुषांची स्मारकं उभी केली जातात पण ज्या महापुरुषांच्या आदर्शाने ज्यांनी त्या वास्तूत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला चालना दिली ते घर मात्र उपेक्षितच आहे . बाबासाहेबांनी काही काळ लंडनमधील ज्या घरात आयुष्य घालवलं ते घर सरकारने विकत घेतले पण ज्या घरात हा महाराष्ट्र घडण्यासाठी जीवाचं रान झालं ते घर दुर्लक्षित आहे हे दुर्दैवच. ज्या घरात आचार्य अत्रे, डांगे,गव्हाणकर करंदीकर,अण्णाभाऊ साठे अशी मंडळी रोज ये जा करत होती ती वास्तू स्मारक म्हणून जतन व्हावी एवढी साधी अपेक्षा सरकारला जमत नाही हे मराठी माणसाचं दुर्भाग्य म्हणावं लागेल. उगाच आपली अपेक्षा राहते कि त्या घरातून ‘संयुक्त महाराष्ट्र उगवतो आहे’ असे ऐकायला मिळावे.
एक चार खोल्या सोडून एक दहा बाय दहाची खोली आहे जिथे आजीबाई राहतात त्याचं नाव केसरबाई. हि तीच मुलगी जीणे शाहीर अमर शेख यांच्या शाहिरीने प्रभावित होऊन साताऱ्याहून कुटुंबासहित मुंबईला येवून राहिली. आणि उभं आयुष्य कलेसाठी समर्पित केलं. घरात त्यांच्या शाहिरी सामानाचा नुसता खच पडला आहे, भिंतीवर एखाद दुसरा देवाचा फोटो ,खाली दोन फोटो एक त्याचे पती जैनू शेख व दुसरा शाहीर अमर शेख यांचा. अमर कला पथकाची धुरा ज्यांनी आयुष्यभर संभाळली त्या केसरबाई पतीच्या निधनांनंतर आणि टीव्हीच्या युगात शाहिरीला लागलेल्या अवकळेने अगदी हालाकीत जगत आहेत. त्यांचा मुलगा निशांत याच्या मुखातून आजही अमर शेख जागे होतात पण शेवटी ज्या जमान्यात शाहीर अमर शेख हे नावचं धूसर झालंय तेथे याची तरी काय गत राहणार?
ज्या शाहिराने संयुक्त महाराष्ट्र आंदोलनासाठी आपल उभ आयुष्य खर्च केले त्याची उपेक्षित कथा अंगावर शहारे आणते. त्यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाच्या निमित्ताने का असेना तुम्ही आम्ही बेळगावकर त्यांची आठवण करूया . त्यांना मुजरा करूया.

लेखन-पियुष हावळ

 belgaum

1 COMMENT

  1. मुस्लिम असूनही शाहीरांच नाव अमर शेख कस पडल याचा उलगडा झाला असता तर सर्वांना अमर हे नाव कस पडल हे समजल असत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.