बेळगाव दि २५ -डॉ . सुधांशु आणि सारंग कुलकर्णी या पिता पुत्राच्या संवादिनी वादनाची जुगलबंदी ,संवादिनीतून बाहेर पडणारे सूर आणि गायिका भारती वैशंपायन यांनी आपल्या गायनाद्वारे केलेली सुरांची बरसात यामुळे कै . पंडित रामभाऊ विजापूरे यांच्या जल्मशताब्दी कार्यक्रमाला उपस्थित रसिक स्वर आणि सुरांच्या वर्षावात चिंब झाले .
प्रख्यात संवादिनी वादक कै .पंडित रामभाऊ विजापूर यांच्या जल्मशताब्दी वर्षानिमित्त कर्नाटक संगीत नृत्य अकादमी आणि सुरेल संवादिनी संवर्धन यांच्यातर्फे संगीतसंध्या कार्यक्रमाचे लोकमान्य रंग मंदिरात आयोजन करण्यात आले होते . नांगनूर रुद्राक्षी मठाचे सिद्धराम स्वामीजी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले . कर्नाटक संगीत ,नृत्य अकादमीच्या अध्यक्षा गंगम्मा केशवमूर्ती गायिका भरती वैशंपायन ,सुरेल संवादिनीचे सुधांशु कुलकर्णी ,शिरीष जोशी ,गायक राजप्रभू धोत्रे ,रामभाऊंच्या कन्या कुसुम कुलकर्णी आदी मान्यवर संगीतसंध्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होती .
> डॉ . सुधांशु आणि सारंग यांनी संवादिनी जुगलबंदी सादर करताना यमन रागातविलंबित एक तालातील एक बंदिश व नंतर द्रुत एक तालातील एक बंदिश पेश केली . शेवटी मिश्र पिलू रागातील दे हाता शरणागता हे मानापमान नाटकातील पद सादर केले . अत्यंत समरसपूर्ण अशीच संवादिनी वादनाची जुगलबंदी झाली . त्यांना तबला साथ अंगद देसाई यांनी केली .
> सुप्रसिद्ध गायिका भारती वैशंपायन यांनी राग जोगकंस मधील सुघर वर पायो आणि पीर पराई या पंडित गुणिदास यांच्या बंदिशी सादर केल्या . त्यानंतर निंद न आये ही बिहारी रागातील बंदिश पेश केली . त्यानंतर नाट्यगीते ,अभंग सादर केली . भैरवीने त्यांनी आपल्या गायनाची सांगता केली . वैशंपायन याना संवादिनी साथ डॉ . रवींद्र काटोटी ,तबला साथ केदार वैशंपायन यांनी आणि तानपुरा साथ स्नेहा राजुरीकर यांनी केली . गुरुराज कुलकर्णी यांनी आभार मानले . संगीतसंध्या कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .