बेळगाव दि २८ : बेळगावचा महापौर व उपमहापौर मराठीच असतील हे जरी खरे असेल तरीही गाफील राहून चालणार नाही. कारण गेले वर्षभर विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली दहा नगरसेवकांचा एक गट वेगळा काम करत होता, तरीही वर्षभर सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी त्या दहा नगरसेवकाना वरवर बोलवायचं आणि काही नगरसेवक टोमणे मारायचे हे चालू होते,
त्यामुळे एकत्र न येता दोन्ही गटात दुरीच निर्माण होत गेली. अजूनही वेळ गेली नाही, त्या दहा नगरसेवकांचे म्हणणेही दुर्लक्षून चालणारे नाही, कारण गेल्या दोन निवडणुकीत बहुसंख्य नगरसेवकांचे म्हणणे डावलून निर्णय झाला असे त्याचे म्हणणे आहे.
याचाही विचार होणे गरजेचे आहे, परत ते नगरसेवक आणखी एक संदर्भ देताहेत कि आम्हीही मराठी महापौर आणि उपमहापौरांनाच मतदान करणार आहोत. मग आमच्या उमेदवाराला कोण मतदान करेल ते करेल, कारण या अगोदर हा प्रकार झालेला आहे, मराठी महापौर आणि मुस्लिम किंवा कानडी उपहापौर झालेले आहेत. आणि या वेळेला असा प्रयोग झाला तर आश्चर्य वाटू नये.
तेंव्हा आमदार संभाजी पाटील यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे, आणि ते यातून निश्चित मार्ग काढून महापौर आणि उपमहापौरासह सर्व पदे मराठी भाषिक नगरसेवकानाच मिळऊन देतील यात शंका नाही.
यासाठी आज दोन्ही गटांपैकी कोणीही प्रतिष्ठा महत्वाची न करता कोणीतरी तडजोड हि केलीच पाहिजे, आणि जनतेने तुम्हाला एका वेगळ्या विचाराने निवडून दिले आहे, याचाही विसर पडू नये, अन्यथा जनता तुम्हला माफ करणार नाही. कारण पैसा सर्वश्रेष्ठ नव्हे?
बातमी सौजन्य : महादेव पाटील बेळगाव