बेळगाव दि २४ : बेळगाव महा पालिकेवर मराठी महापौर आणि उपमहापौर निवडून आणण्यासाठी सर्व मराठी नगरसेवक नगरसेविकांनी एकत्र यावे ही भूमिका आम्ही बेळगाव लाईव्ह च्या माध्यमातून मांडली. गट तट करून महापौर आणि उपमहापौरपद दुसऱ्यांच्या हाती देण्यापूर्वी मतदान केलेल्या जनतेची अब्रू राखा असे आवाहन आम्ही केले होते. हे आवाहन पाहून जनताच जागृत होऊ लागली असून आपण निवडून दिलेल्या नगरसेवकांच्या मनसुब्यांवर लगाम घालू लागली आहे.
वॉर्ड क्र ३८ अर्थात चव्हाट गल्लीतील पंचमंडळींनी याबाबतीत पुढाकार घेतला, आपले नगरसेवक पुंडलिक परीट यांच्याकडून त्यांनी एक हमीपत्रच घेतले आहे. मी मराठी भाषिकांच्या मतांवर निवडून आलो आहे, त्यामुळे कोणत्याही दडपणाखाली न येता मराठीच्या स्वाभिमानाने म ए समिती व मराठी विकास आघाडीशी बांधील राहीन, अशी शपथ या हमीपत्रात नगरसेवक परीट यांनी घेतली आहे. इतर वॉर्डातही अशी हमी किंवा शपथ पत्रे लिहून घेण्यासाठी सर्व पंचा मंडळींनी पुढे यावे अशी गरज आहे.
बेळगाव live च्या या सकारात्मक इम्पॅक्ट मधून समितीची सत्ता अबाधित राहणार असेल तर चीज होईल. चव्हाट गल्लीतील पंच मंडळीचा आदेश शहरातील इतर पंच मंडळी आणि मराठी प्रेमीनी घ्यावा असे पुन्हा एकदा आम्ही मराठी जनतेस अवाहन करत आहोत.