कर्नाटकात श्रीराम सेनेच्या मदतीने शिवसेना कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे शुक्रवारी हुबळीत पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत कर्नाटक सह संपर्क प्रमुख अरविंद नागनूरी यांच्या उपस्थितीत सिद्धलिंग स्वामीजी यांनी बेळगाव सह सीमाभाग कर्नाटकाचा अविभाज्य भाग असून तो कर्नाटकातच राहील असे सांगून सीमाभागातही निवडणूक लढवणार आहे असे स्पष्ट केले आहे, कर्नाटकात राजकीय विस्तार करू पाहणाऱ्या शिवसेनेला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा विसर पडला की काय हा प्रश्न सीमावासीयांना पडला आहे.
धनुष्य बाण या शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर संपूर्ण कर्नाटकात शिवसेनेने निवडणूक लढवण्यास काहीच हरकत नाही, पण सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना पाठींबा देत आलेल्या शिवसेनेची निवडणुकीच्या तोंडावर अशी भाषा कशी बदलली आणि सीमाभाग महाराष्ट्रात सहभागी करण्याच्या मुद्द्याला बगल का दिली गेली? याला स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सहमती आहे का ? की अरविंद नागनूरी सारख्या मंडळींनी स्वतःच्या जीवावर हे निर्णय घेतले? हे प्रश्न उपस्थित होत आहेत.
कर्नाटकात १० ते १५ वर्षांपासून शिवसेना काम करीत आली आहे. मात्र सीमाभागात शिवसेनेने नेहमीच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली आहे. समितीच्या झेंड्याखालीच नगरसेवक होऊन प्रकाश शिरोळकर उपमहापौर झाले हा इतिहास आहे. स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सीमाप्रश्न सुटेतोवर शिवसेना समितीच्या झेंड्याखाली राहील हे स्पष्ट केले होते, याचा विसर नागनुरी यांना पडला की त्या स्वामींना त्यांना आवरता आले नाही? मग कर्नाटक सह संपर्क प्रमुखपद निभावण्यास ते समर्थ आहेत का? हे शिवसेनाच जाणे,
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शिवसेनेने दिलेल्या १०० हुन जास्त हुतात्म्यांचा हा अपमान नाही का ? आगामी विधानसभा निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवण्यात येणार आहे. इतर पक्षांपेक्षा हिंदुत्वावर भविष्यात शिवसेनाच जास्त आक्रमक असणार आहे. हे जरी ठीक असले तरी हिंदुत्वासाठी शिवसेना सीमाप्रश्नाशी फारकत घेणार काय? याची उत्तरे द्याविच लागतील.
गुलबर्गा, कारवार, बिदर नव्हे तर बेंगुळुरुतही शिवसेनेचा भगवा फडकला तरी गैर काहीच नाही, पण बेळगावात फडकणाऱ्या समितीच्या भगव्या विरोधात शिवसेनेचा भगवा उभा करण्याचे धाडस कोण करीत आहे? यावर उद्धवजींचे नियंत्रण आहे का? आणि सारेकाही त्यांच्याच सल्ल्याने होत असेल तर यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते?
1 nagarsevak anu shakat nahi RAM SENA ANI SHIV SENA ani AAMDAR KUTHUN ANANAR