बेळगाव लाईव्ह : बेळगावचा ऐतिहासिक गणेशोत्सव शांततेत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. गणेशोत्सव मंडळांसोबत नुकत्याच झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत, प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. यंदा ३०७ हून अधिक गणेश मंडळे सहभागी होणार असल्याचा अंदाज असून, प्रशासनाने नियमावली जाहीर केली तर मंडळांनीही आपल्या मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या आहेत.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसाठी कठोर नियमावली तयार करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन करत, बेळगावचा ऐतिहासिक गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांकडून सहकार्य मिळेल, असे आश्वासन दिले.
या बैठकीत वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि हेस्कॉमलाही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्यापासून ते रस्त्यांची डागडुजी करण्यापर्यंतच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विसर्जनासाठी प्रत्येक मंडळाला केवळ अर्धा तास दिला जाईल. याशिवाय, रात्री १० वाजेनंतर साउंड सिस्टीम वापरण्यास सक्त मनाई घालण्यात आली आहे. विशेषतः, उत्तर भागातील गणेश मूर्ती मिरवणूकीत टिळक चौक आणि शहापूरकडून येणाऱ्या मिरवणुकांमध्ये साउंड सिस्टीम बँक ऑफ इंडिया सर्कल आणि जॅकिन होंडा कडे असणाऱ्या मराठा मंदिरापाशी अडवली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी काही महत्त्वाच्या मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या. कपिलश्वर तलावात विसर्जन करण्याची भावना असून, पोलिसांनी इतरत्र विसर्जनासाठी दबाव आणू नये, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, अरुंद रस्त्यांमुळे मूर्ती घेऊन जाण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, रस्त्यांची आणि विसर्जन तलावांची दुरुस्ती गणेशोत्सवापूर्वीच करण्याचे आवाहनही करण्यात आले. यासोबतच, गणेशोत्सवाच्या काळातच येणाऱ्या ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही समुदायांची संयुक्त बैठक घेण्याची सूचनाही करण्यात आली. महानगरपालिकेने रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करावीत आणि अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करावेत, विविध विभागांच्या परवानग्या मिळवण्यासाठी मंडळांना वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते.
हे टाळण्यासाठी जुनी कॉर्पोरेशन इमारत आणि गणेशपूर सर्कल येथील कॉर्पोरेशन कार्यालयात ‘एक खिडकी’ पद्धतीने परवानगी देण्याची सोय करावी. रमाकांत कोंडूस्कर यांनी ११ दिवसांच्या दारूबंदीची मागणी केली, तर नगरसेवक गिरीश धोंगडी यांनी गणेश मंडळांना परवानगी देताना कार्यकर्त्यांचे फोटो जमा करण्याची पद्धत थांबवण्याची आणि दुकानदारांना जास्त वेळ व्यवसाय करण्याची मुभा देण्याची विनंती केली.
शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी, मंडळांनी रात्री १० वाजेपर्यंत साउंड सिस्टीम वापरून सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच, बळजबरीने वर्गणी गोळा करू नये, अश्लील गाणी लावू नयेत आणि मिरवणुकीत योग्य प्रकाशाची व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले. कोणतीही समस्या उद्भवल्यास पोलिसांशी थेट संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या बैठकीला महानगरपालिका आयुक्त शुभा बी., डीसीपी भरमणी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.



