बेळगाव लाईव्ह: शेतीसाठी युरियाची अनुपलब्धता आणि परिवहन खात्याच्या गलथान कारभाराचा निषेध करण्यासाठी बेळगाव परिसरातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. या दोन्ही महत्त्वाच्या मागण्यांसाठी लवकरच आंदोलन करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
या वर्षी लवकर पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची मशागत अपूर्ण राहिली. त्यातच अतिवृष्टीमुळे पिकांची वाढ खुंटली आहे, ज्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत पिकांच्या चांगल्या वाढीसाठी युरियाची अत्यंत गरज आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांना युरिया मिळत नाहीये. जेथे उपलब्ध आहे, तिथे युरियासोबत इतर खते किंवा औषधांच्या बाटल्या घेण्याची सक्ती केली जात आहे. या ‘लिंकिंग’मुळे छोट्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
दुसरीकडे, वडगाव, शहापूर, जुने बेळगावसह इतर भागातील शेतकरी महिलांना कर्नाटक सरकारने मोफत बससेवा देऊनही अरेरावीचा सामना करावा लागत आहे. येळ्ळूर, यरमाळ आणि धामणे या रस्त्यांवर बसचालक मुख्य थांब्यांवरही बस थांबवत नाहीत. यामुळे महिलांना रिक्षाने प्रवास करावा लागतो. अलीकडेच धामणे रस्त्यावर बस न थांबवल्याने महिलांनी पुढे जाऊन बसला अडवून चालकाची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच, एका घटनेत एका बसवाहकाने पावसाने भिजलेल्या शेतकरी महिलेला ‘सीट ओली होईल’ म्हणून बसण्यास मनाई केली. त्यावेळी एका सुशिक्षित महिलेने “हे शेतात राबतात म्हणूनच आपण जेवतो,” असे सुनावल्यावर तो वाहक शांत झाला.
युरियाचा त्वरित पुरवठा करावा आणि येळ्ळूर, यरमाळ, धामणे रस्त्यांवर बस नियमित थांबवावी, या मागण्यांसाठी वडगाव, शहापूर आणि जुने बेळगाव परिसरातील शेतकरी आणि महिला लवकरच संबंधित खात्यांवर धडक देऊन आंदोलन करणार आहेत.



