बेळगाव लाईव्ह: जुन्या वर्षाला निरोप देऊन नववर्ष 2026 च्या स्वागतासाठी आपण सर्वजण सज्ज झालो असलो तरी मेजवानीचा बेत आखलेल्या युवा पिढीने आपले आई-वडील घरी आपली वाट पाहत आहेत हे लक्षात ठेवून भरकटात न जाता आज रात्री थर्टी फर्स्ट अर्थात 31 डिसेंबर काळजीपूर्वक सुरक्षित साजरा करावा, असे जाहीर आवाहन माजी महापौर व सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांनी केले आहे.
आजच्या 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून ते बोलत होते. माजी महापौर मोरे म्हणाले की, शहरातील समस्त युवक -युवतींनी रात्री घराबाहेर पडून आजचा थर्टी फर्स्ट साजरा करताना कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी. स्वतःची काळजी घेण्याबरोबरच घरामध्ये आपल्या आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंब आपली वाट पाहत आहे हे ध्यानात ठेवावे.
गेल्या 15 वर्षाच्या अनुभवातून मी हे सांगत आहे. या दीड दशकात दर 31 डिसेंबर रोजी रात्री 12 ते 2 वाजेपर्यंत मी माझ्या सहकाऱ्यांसह बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलच्या कॅज्युअलिटी विभागात ठाण मांडून असतो.
कारण बेभान होऊन थर्टी फर्स्ट साजरा केल्यामुळे कित्येक युवकांचा अपघात होत असतात. त्यावेळी अशा युवकांना तातडीने योग्य वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी मी व माझा मित्रपरिवार आवश्यक ते सर्व सहकार्य करत असतो अशी माहिती देऊन तेंव्हा माझी युवा पिढीला विनंती आहे की मागील वर्षी ज्या पद्धतीने आम्ही अपघातग्रस्त पाच-सहा युवकांचा जीव वाचवला, तसे यावेळी होऊ नये यासाठी सर्वांनी छान पद्धतीने थर्टी फर्स्ट डिसेंबर साजरा करून नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत करावे.
पार्टी, मौजमजा वगैरे करताना प्रत्येकाने त्यांचा परिवार त्यांची घरी वाट पाहत आहे हे ध्यानात ठेवून थर्टी फर्स्ट साजरा करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे, असे माजी महापौर विजय मोरे शेवटी म्हणाले.





