बेळगाव लाईव्ह : शारीरिक मर्यादांवर जिद्दीने मात करत वृंदावनहून कन्याकुमारीकडे निघालेला एक दिव्यांग प्रवासी आज बेळगावमध्ये दाखल झाला. गेल्या चार महिन्यांपासून ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता सुरू असलेला हा प्रवास पाहून बेळगावकरांनी या प्रवाशाच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
आज सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास हलगा येथील सुवर्ण विधानसौधच्या प्रवेशद्वाराजवळ हा प्रवासी आपल्या सायकलसह दिसून आला. त्याच्या प्रवासाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे,
आजच्या डिजिटल युगातही त्याच्याकडे साधा मोबाईल फोन देखील नाही. वाटेत भेटणाऱ्या लोकांना रस्ता विचारत त्याने वृंदावनपासून बेळगावपर्यंतचा टप्पा यशस्वीपणे पार केला असून, आता तो रामेश्वरम मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे.

या प्रवाशाने आपल्या सायकलवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला भगवा झेंडा अत्यंत अभिमानाने लावला आहे. याबाबत त्याला विचारले असता, “छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या देशातील
एक महान आणि वंदनीय व्यक्तिमत्व आहे. संपूर्ण देशात त्यांना मानले जाते, म्हणूनच मी त्यांचा हा झेंडा लावून प्रवास करत आहे,” असे या प्रवाशाने सांगितले. शारीरिक व्याधीवर मात करत भक्ती आणि जिद्दीच्या जोरावर निघालेल्या या प्रवाशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





