बेळगाव लाईव्ह : बैलहोंगल तालुक्यातील बेळवडी येथील एका ४९ वर्षीय महिलेला लग्नाची डिजिटल पत्रिका पाहणे चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी पाठवलेली एक घातक ‘एपीके’ फाईल उघडताच या महिलेच्या बँक खात्यातून तब्बल २,१७,७०५ रुपये लंपास करण्यात आले आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पीडित महिलेला एका अनोळखी क्रमांकावरून लग्नाची पत्रिका असल्याचे भासवून एक फाईल पाठवण्यात आली होती. ती खरी पत्रिका असावी या समजुतीने महिलेने फाईल उघडली. त्यानंतर ३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीत त्यांच्या खात्यातून अनधिकृतपणे टप्प्याटप्प्याने पैसे काढले गेले. बँक खात्यातून पैसे कमी झाल्याचे संदेश प्राप्त झाल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
मोबाईलमध्ये ही फाईल डाऊनलोड केल्यानंतर फोन विचित्र पद्धतीने काम करू लागला होता, असे तपासात समोर आले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने तात्काळ सायबर क्राईम हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधला आणि ४ एप्रिल रोजी बेळगाव जिल्हा सायबर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी आता सुरू केला आहे.

सायबर तज्ज्ञांनी अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. लग्नाच्या पत्रिका सहसा फोटो किंवा पीडीएफ स्वरूपात असतात, त्या कधीही ‘एपीके’ फाईलमध्ये नसतात. जर एखादी फाईल इन्स्टॉल करण्यासाठी परवानगी मागत असेल, तर ते धोक्याचे लक्षण समजावे. मोबाईल अचानक हँग होणे किंवा स्क्रीन फ्लिकर होणे ही मालवेअरची लक्षणे असू शकतात.
अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा फाईल्स डाऊनलोड करू नका, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. केवळ अधिकृत ॲप स्टोअरवरूनच खात्रीशीर ॲप्स डाऊनलोड करावेत. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ १९३० या क्रमांकावर किंवा बेळगाव सायबर पोलीस स्टेशनला कळवावे, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.





