बेळगाव लाईव्ह :चिक्कोडी तालुक्यातील कन्नूर टोल प्लाझाच्या ठिकाणी भरधाव मोटरसायकल वरील नियंत्रण सुटल्याने घडलेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना काल शुक्रवारी पहाटे घडली.
मयत मोटरसायकलस्वाराचे नांव प्रवीण आप्पासाहेब माळगे (वय 42, रा. भीमनगर चिकोडी) असे आहे. प्रवीण हा आपल्या मोटारसायकल (क्र. केए-23 इपी-9635) वरून कन्नूरहून चिक्कोडीकडे येत असताना कन्नूर टोल प्लाझावर भरधाव मोटारसायकलवरील त्याचे नियंत्रण सुटले.

परिणामी मोटारसायकल घसरून अपघात झाला. या अपघातात प्रवीण याच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर उपचारासाठी त्याला तातडीने चिक्कोडी दिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तथापि उपचाराचा फायदा न होता काल शुक्रवारी पहाटे 4:15 वाजता त्यांचे निधन झाले. याप्रकरणी चिक्कोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.





