belgaum

बेळगावमध्ये प्राथमिक शिक्षक संघाच्या निवडणुकीवरून नवा वाद

0
245
 belgaum


बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील प्राथमिक शिक्षक संघाची निवडणूक सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांमुळे शिक्षकांनी आता थेट कायद्याचा दरवाजा ठोठावला आहे. प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा गंभीर आरोप करत अनेक शिक्षकांनी मार्केट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही निवडणूक तातडीने स्थगित करण्यात यावी, अशी आग्रही मागणी शिक्षकांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

येत्या १९ तारखेला ही निवडणूक पार पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही अद्याप शिक्षकांना अधिकृत मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

निवडणूक अधिकारी देखील कार्यालयात उपस्थित राहत नसून, अनेक महत्त्वाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचा दावा शिक्षकांनी तक्रारीत केला आहे. १४ एप्रिलची मुदत उलटूनही मतदार यादी प्रसिद्ध न झाल्याने शिक्षकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

 belgaum

दुसरीकडे, शिक्षक संघाच्या कार्यालयाला जिल्हा युनिटकडून कुलूप ठोकण्यात आल्याने संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. या वादावर भाष्य करताना उपस्थित शिक्षकांनी सांगितले की, जिल्हाध्यक्ष जयकुमार हेबळी आणि तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कोलकार हे स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेचा आणि अधिकारांचा चुकीच्या पद्धतीने वापर करत आहेत. या नेत्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे सामान्य शिक्षकांना वेठीस धरले जात असून लोकशाही मार्गाने चालणारी निवडणूक प्रक्रिया दूषित केली जात आहे, असा आरोप शिक्षकांनी केला आहे.

या आंदोलनावेळी एस. जी. कंबळकर, अन्वर लंगोटी, आनंदगौडा काद्रोळी, ईरप्पा गुळन्नवर, आसीफ अत्तार आणि ए. के. तहसीलदार यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडावी आणि सर्व शिक्षकांना त्यांचे अधिकार मिळावेत, यासाठी आपला लढा सुरूच राहील, असा पवित्रा या शिक्षकांनी घेतला आहे. या तक्रारीनंतर आता पोलीस आणि शिक्षण विभाग काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.