belgaum

विनापरवाना साऊंड सिस्टीम लावल्याप्रकरणी सुळेभावीत तिघांवर पोलीस कारवाई

0
224
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील सुळेभावी येथे विनापरवाना आणि कर्कश आवाजात साऊंड सिस्टीम लावल्याप्रकरणी मारीहाळ पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. याप्रकरणी तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेत वापरलेले साऊंड साहित्य आणि एक ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ३ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास सुळेभावी गावातील होसकेरी गल्लीत एका लग्न समारंभाच्या निमित्ताने साऊंड सिस्टीम लावण्यात आली होती. यासाठी संबंधित विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. ही सिस्टीम सार्वजनिक रस्त्यावर लावल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता, तसेच आवाजाची मर्यादा ओलांडल्याने नागरिकांच्या शांततेचा भंग झाल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सुरेश रामप्पा बंगन्नवर (रा. सुळेभावी), वीरभद्र नागप्पा यरगुद्दी (रा. सोमनट्टी, ता. बैलहोंगल) आणि रोहित देवप्पा लक्कनगौडर (रा. सुळेभावी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक उपद्रव आणि ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका या संशयितांवर ठेवण्यात आला आहे.

 belgaum

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत अंदाजे ३२,००० रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये साऊंड बेस (किंमत १२,००० रु.), साऊंड टॉप (किंमत १०,००० रु.), कंट्रोलर मिक्सर (किंमत १०,००० रु.) आणि साऊंड सिस्टीमसाठी वापरलेला एक होंडा जनरेटर यांचा समावेश आहे. याशिवाय, हे साहित्य वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रॅक्टर (क्र. KA-22 T-3566) देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळणे अनिवार्य असून, विनापरवाना ध्वनिक्षेपकांचा वापर करणाऱ्यांवर यापुढेही कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मारीहाळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी आय. एम. शीलवंतर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून पुढील तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.