बेळगाव लाईव्ह :भटके कुत्रे आडवे आल्याने घडलेल्या दुचाकी अपघातातील दोघा गंभीर जखमींना सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांचा जीव वाचवल्याची घटना काल बुधवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास जुन्या पी.बी. रोड ओव्हर ब्रिज जवळील नाल्यावर घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दोघे पॉवरलूम कामगार काल रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्राच्या घरी कार्यक्रमाला जाऊन दुचाकी वरून पी. बी. रोड मार्गे माघारी शहराकडे जात होते. रात्रीच्या वेळी रस्त्यावर तुरळक वाहतूक असल्यामुळे भरधाव निघालेल्या या दोघांच्या दुचाकी समोर एक भटके कुत्रे अचानक आडवे आले.
त्यामुळे त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटून घडलेल्या अपघातात दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. त्यांच्यापैकी एकाच्या डोक्याला इजा होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. एका प्रत्यक्षदर्शीने या अपघाताची माहिती त्वरित सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर यांना दिली.
तेंव्हा तुडवेकर आपले सहकारी पद्मप्रसाद हुली, विकी मेहता आणि मायकल पिंटो यांना सोबत घेऊन तात्काळ घटनास्थळी पोहोचले. या सर्वांनी वेगाने हालचाल करत 108 रुग्णवाहिका बोलावून घेऊन जखमींना उपचारासाठी सिव्हिल अर्थात बिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. एवढे करून न थांबता अवधूत तुडवेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना तातडीने आवश्यक उपचार मिळतील याची काळजी घेतली.
याबद्दल जखमींच्या कुटुंबीयांनी या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यांच्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी महापालिकेने तातडीने प्रभावशाली कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.





