बेळगाव लाईव्ह : मध्यवर्ती शिवजयंती महामंडळाच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर आक्षेप घेत निवड समितीतील सदस्यांनी राजीनामा देण्याचे सत्र सुरूच ठेवले असून, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि ज्येष्ठ शिवप्रेमी बंडू केरवाडकर यांनीही आपल्या कार्यकारी सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.
बंडू केरवाडकर यांनी शिवजयंती महामंडळाच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पारदर्शक असावी, तसेच चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ती करणे गरजेचे होते; मात्र तशा पद्धतीने ही अध्यक्ष निवड झाली नाही, असा आक्षेप घेतला आहे.
या बैठकीमध्ये मी गैरहजर होतो; मात्र शेकडो वर्षांची परंपरा असलेली शिवजयंती मानाची आहे. त्यासाठी एका ताकदवान आणि कणखर अध्यक्षाची नियुक्ती गरजेची होती. व्यापक बैठक घेऊन जनजागृती करून पदाधिकाऱ्यांचे मत ऐकून घेणे आवश्यक होते. अशी कोणतीही प्रक्रिया न करता खजिनदारांनी आपल्या मर्जीचा अध्यक्ष खिशातून चिठ्ठी काढून नाव घेऊन निवडला आहे.

त्यावेळी सर्वांना दबाव टाकत सांगितले की, मी जो अध्यक्ष नियुक्त करेन, त्याला सर्वांनी स्वीकारले पाहिजे आणि त्याला विरोध करू नये, असे सुनावत निवड करण्यात आली.
अशा लोकशाही नसलेल्या संघटनेमध्ये पदाधिकारी म्हणून काम करणे मला शक्य नाही, त्यामुळे माझा राजीनामा स्वीकारावा, असे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.





