बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या मातीतील जिद्द आणि चिकाटीचा प्रत्यय पुन्हा एकदा देशपातळीवर पाहायला मिळाला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, कलखांब येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील सुपुत्र राहुल पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत २२४ वी श्रेणी प्राप्त करून यशाचे शिखर सर केले आहे. ‘बेळगाव लाईव्ह’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत राहुल पाटील यांनी आपला हा थक्क करणारा प्रवास, संघर्षाचे दिवस आणि यशाची गुरुकिल्ली उलगडली आहे. ग्रामीण भागातील मुलांनी पाहिलेले स्वप्न मेहनतीच्या जोरावर कसे सत्यात उतरवता येते, याचा वस्तुपाठच राहुल यांनी घालून दिला आहे.
राहुल पाटील यांचा हा प्रवास वनिता विद्यालयाच्या बाकावरून सुरू झाला. कलखांब येथील वनिता विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बेळगावच्या आर.एल.एस. महाविद्यालयातून पीयूसी पूर्ण केली आणि पुढे बेंगळुरू येथील प्रतिष्ठित आर.व्ही. अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी संपादन केली. विशेष म्हणजे, बारावीत असतानाच त्यांची निवड एनडीए (NDA) साठी झाली होती. देशसेवेची संधी दारात असतानाही, प्रशासकीय अधिकारी बनून समाजाच्या तळागाळातील प्रश्नांवर काम करण्याच्या ध्येयापोटी त्यांनी एनडीएची संधी नाकारली. एका मोठ्या करिअरचा त्याग करून नागरी सेवेचा अनिश्चित आणि खडतर मार्ग निवडणे, हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात धाडसी निर्णय ठरला.
निकाल जाहीर झाल्यानंतर महिनाभराने आपल्या मायभूमी कलखांबमध्ये परतलेल्या राहुल यांचे ग्रामस्थांनी एखाद्या उत्सवाप्रमाणे स्वागत केले. ‘बेळगाव लाईव्ह’शी संवाद साधताना राहुल म्हणाले की, “जेव्हा निकाल पाहिला तेव्हा गेल्या सहा-सात वर्षांच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज झाल्याचे वाटले. यूपीएससी म्हणजे केवळ बुद्धिमत्तेचा कस नाही, तर तो संयमाचा आणि शिस्तीचा मोठा प्रवास आहे.” राहुल यांनी एकूण सहा वेळा ही परीक्षा दिली. चौथ्या प्रयत्नात ८०२ वी रँक मिळवून त्यांची निवड ‘भारतीय वन सेवेसाठी’ (IFS) झाली होती. मात्र, आयएएस होण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. वन सेवेत अधिकारी म्हणून निवड होऊनही त्यांनी आपली जिद्द सोडली नाही आणि सहाव्या प्रयत्नात २२४ व्या श्रेणीपर्यंत झेप घेतली.

अभ्यासाच्या पद्धतीबद्दल सांगताना राहुल यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या मते, अभ्यासात केवळ पाठांतर नसावे तर विषयाचे सखोल आकलन असणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातून आल्यामुळे सुरुवातीला इंग्रजी भाषेचा अडथळा आला, मात्र कष्ट करण्याची तयारी असेल तर जगातली कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे त्यांनी आपल्या प्रगतीतून दाखवून दिले. “सुरुवातीला आत्मविश्वास थोडा कमी होता, पण प्रत्येक अपयशातून मी शिकत गेलो. ज्या विषयांत गुण कमी होते, त्याचे विश्लेषण करून त्यावर मेहनत घेतली,” असे राहुल पाटील यांनी नमूद केले.
सीमाभागातील आणि विशेषतः मराठी भाषेतील विद्यार्थ्यांसाठी राहुल पाटील यांनी दिलेला संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. “यूपीएससी ही अत्यंत सर्वसमावेशक संस्था आहे. येथे भाषेचा कोणताही भेदभाव केला जात नाही. मराठी किंवा इतर प्रादेशिक भाषांतूनही ही परीक्षा देऊन अधिकारी होता येते. दहावी-बारावीच्या गुणांचा आणि या परीक्षेतील यशाचा कोणताही संबंध नसतो, फक्त तुमची दिशा योग्य हवी,” असे त्यांनी ‘बेळगाव लाईव्ह’च्या माध्यमातून स्पष्ट केले. आपल्या या यशात आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र आणि वनिता विद्यालयातील गुरुजनांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी कृतज्ञतेने सांगितले. भविष्यात बेळगाव आणि सीमाभागातील गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी आपण सदैव उपलब्ध राहू, अशी ग्वाही देखील राहुल पाटील यांनी यावेळी दिली.





