बेळगाव लाईव्ह : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली बेळगावमधील विशेष पोक्सो न्यायालयाने एका २८ वर्षीय तरुणाला ३० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. हुक्केरी तालुक्यातील साकुराणी येथील बसवराज उर्फ सूरज थिम्मनावर याला न्यायालयाने दोषी ठरवत १ लाख रुपये दंडही ठोठावला आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, आरोपी बसवराज याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तिला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. ३० सप्टेंबर २०२३ रोजी त्याने पीडितेवर हरगापूर येथील डोंगरावरील किल्ल्यावर नेऊन बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर तिचे अश्लील फोटो काढून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तिला वारंवार ब्लॅकमेल करत अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर सिद्ध झाला आहे. याप्रकरणी संकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संकेश्वर पोलीस ठाण्याचे एएसआय बी. एस. मदार यांनी या प्रकरणाची नोंद केली होती, तर सीपीआय एस. एम. आवाजी यांनी तपास करून बेळगावमधील विशेष जलदगती पोक्सो न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी प्रकरणाची सुनावणी करताना ८ साक्षीदारांच्या साक्षी आणि ६६ कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे बसवराज याला दोषी ठरवले.
न्यायालयाने दोषीला ३० वर्षांच्या कारावासासह १ लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले असून, दंड न भरल्यास अतिरिक्त १ वर्षाची शिक्षा भोगावी लागणार आहे. तसेच, पीडित मुलीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ४ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही रक्कम ५ वर्षांसाठी राष्ट्रीयीकृत बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी प्रभावीपणे काम पाहिले.





