belgaum

एकाच दिवशी पती-पत्नीचा दुर्दैवी अंत

0
2111
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील अळवळी गावात एकाच दिवशी पती आणि पत्नीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मधुरा करेप्पा मादार या गेल्या काही दिवसांपासून आजारपणामुळे त्रस्त होत्या. या त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या या अकाली निधनामुळे कुटुंबातील सदस्यांचा आक्रोश काळजाचा थरकाप उडवणारा होता.

दुसरीकडे, पत्नीच्या मृत्यूची बातमी समजताच पती करेप्पा गंगाप्पा मादार हे तातडीने रुग्णालयाकडे जाण्यासाठी निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला आणि या अपघातात करेप्पा यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नीपाठोपाठ पतीचाही मृत्यू झाल्याने अळवळी ग्रामस्थ सुन्न झाले आहेत.

 belgaum

या दाम्पत्याचा नऊ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगी आणि दोन मुले अशी तीन अपत्ये आहेत. आई आणि वडील दोघांचेही छत्र एकाच दिवशी हरपल्याने या चिमुकल्यांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे. या घटनेमुळे केवळ मादार कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण गावकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत.

घटनेची माहिती मिळताच बैलहोंगल पोलिसांनी अळवळी गावात भेट देऊन पाहणी केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात अत्यंत शोकाकुल वातावरण निर्माण झाले असून, मृत मादार कुटुंबाप्रती सर्व स्तरातून सांत्वन व्यक्त केले जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.