बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील नावगे येथील रहिवासी गुंडू पाटील यांनी गेल्या पाच वर्षांपासून आपल्या घराचा पाणीपुरवठा रोखण्यात आल्याचा आरोप केला आहे. नावगे गावातील रामलिंग गल्लीमध्ये राहणाऱ्या पाटील यांच्या कुटुंबाला किणये ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याची तक्रार त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली.
गुंडू पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, नावगे गावातील प्रत्येक घराला पाईपलाईनद्वारे नियमित पाणीपुरवठा होतो, मात्र केवळ त्यांच्या घराची जोडणी कापून त्यांना पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. “गेल्या १० ते १५ वर्षांपासून मी रस्ते, वीज आणि पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि पिडीओंकडे हेलपाटे मारत आहे, पण माझ्या समस्येकडे कोणीही लक्ष दिलेले नाही,” असे गाऱ्हाणे त्यांनी मांडले.
विशेष म्हणजे, या अन्यायाविरोधात गुंडू पाटील यांनी २०२१-२२ मध्ये माहिती अधिकारांतर्गत तक्रार दाखल करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. प्रशासकीय पातळीवर दाद मिळत नसल्याने त्यांनी आता बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना पत्र लिहून साकडे घातले आहे.
आपल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, घराला साधे पिण्याचे पाणी आणि वीज नसल्यामुळे कुटुंबाचे प्रचंड हाल होत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असून, आमदारांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, अशी विनंती गुंडू पाटील यांनी केली आहे. अन्यथा, आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.





