बेळगाव लाईव्ह :कर्नाटक विधानपरिषदेचे सदस्य तसेच मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते आमदार मारुतीराव मुळे यांनी आज जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत कर्नाटकातील होदिगिरी येथे असलेल्या स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांच्या समाधीच्या संवर्धन व विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या ऐतिहासिक स्थळाचे जतन, सुशोभीकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर दोन्ही नेत्यांनी विचारमंथन केले.
तसेच ‘दक्षिण स्वराज्य सर्किट’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेवरही सविस्तर चर्चा झाली. दक्षिण भारतातील शिवकालीन व मराठा इतिहासाशी संबंधित स्थळांना एकत्र जोडून पर्यटनाला चालना देण्याचा या संकल्पनेचा उद्देश असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या बैठकीत ऐतिहासिक वारशाचे जतन आणि भावी पिढ्यांपर्यंत स्वराज्याची परंपरा पोहोचवण्यासाठी समन्वयाने काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.





