बेळगाव लाईव्ह :सभासमारंभ, उत्सवाप्रसंगी लावण्यात येणाऱ्या साऊंड सिस्टिमची ध्वनी मर्यादा प्रशासनाने 70 ऐवजी 90 डेसिबल करावी या मागणीसह यापुढे प्रशासनाने घालून दिलेल्या नियम, निर्बंधानुसार काम करण्याचा निर्णय बेळगाव शहरातील साऊंड सिस्टिम ओनर्स असोसिएशन, जनरेटर ओनर्स असोसिएशन वगैरे संघटनांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे.
शहरातील साई भवन येथे आज शुक्रवारी सकाळी उपरोक्त बैठक पार पडली. बैठकीसंदर्भात माहिती देताना साऊंड सिस्टिम ओनर्स असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, आजच्या बैठकीमध्ये साऊंड सिस्टिम, जनरेटर, लाइटिंग वगैरे सर्व व्यावसायिकांनी यापुढे प्रशासनाने घालून दिलेल्या नियम निर्बंधानुसार काम करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.
तसेच आम्हाला जी 70 डेसिबलची मर्यादा घालून दिली आहे ती वाढवून 90 डेसिबल करावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्याचा ठराव बैठकीत सर्वानुमते संमत करण्यात आला आहे. प्रशासन आम्हाला सहकार्य करत असेल तर प्रशासनाला सहकार्य करणे आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे.
आमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या व्यवसायासाठी एक लाखापासून कोट्यावधी रुपयांपर्यंत गुंतवणूक केली आहे. त्याचे व्याज आम्हाला भरावे लागते. आम्ही करत असलेल्या व्यवसायावर आमच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो, मुलाबाळांचे शिक्षण होते.
त्यामुळे व्यवसायात बंद झाला तर आम्हाला घर चालवणे कठीण होणार आहे. त्यामुळे यापुढे प्रशासन सांगेल त्याप्रमाणे कार्यरत राहण्याचे आम्ही सर्वानुमते ठरवले आहे. फक्त प्रशासनाने आम्हाला ध्वनी मर्यादा 90 डेसिबल पर्यंत वाढवून द्यावी. याव्यतिरिक्त आजच्या बैठकीमध्ये परगावचे साऊंड सिस्टिमवाले बेळगावात येतील तेंव्हा त्यांना आमच्या संघटनेने किंवा प्रशासनाने येथील नियम, निर्बंधांची कल्पना द्यावी, असे ठरवण्यात आले आहे.

यासाठी बाहेरून साऊंड सिस्टिम मागणाऱ्या मंडळाशी प्रशासनाने संपर्क साधावा. साऊंड सिस्टिम ध्वनीची तीव्रता वाढवली जाऊ नये, तो स्वच्छ व सुस्पष्ट असावा. ज्यामुळे सार्वजनिकांना त्रास न होता त्यांच्याबरोबर आम्हाला देखील फायदा होईल.
एकाच ठिकाणी साऊंडची थप्पी न लावता दोन-तीन ठिकाणी कामे घेऊन कमी साऊंड लावून ती पूर्ण करणे. ज्यामुळे आमच्या व्यवसायात देखील वृद्धी येईल. चार पैसे जास्त मिळतील, असा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे त्या पदाधिकाऱ्याने शेवटी सांगितले.





