बेळगाव लाईव्ह : दरवर्षीप्रमाणे यंदाही 21 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता शिवजयंती चित्ररथ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, या पार्श्वभूमीवर शिवजयंती चित्ररथ महामंडळाने नियोजनाला वेग दिला आहे. रविवारी धर्मवीर संभाजीराजे चौक येथील जत्तीमठ येथे झालेल्या बैठकीत चित्ररथ मंडळांच्या समस्या सोडवण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.
महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत यंदाचा उत्सव अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि अभूतपूर्व पद्धतीने साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या लौकिकाला साजेसा उत्सव साजरा करण्यासाठी विविध मंडळांच्या सूचनांवर विचारविनिमय करण्यात आला.
मिरवणूक वेळेत सुरू करून वेळेतच पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला. कोणताही वाद निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करत शिस्तबद्ध वातावरणात मिरवणूक पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच मंडळांच्या अडचणी सोडवण्यासाठी महामंडळ कटिबद्ध असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले.
यंदापासून उत्कृष्ट चित्ररथ स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून, प्रसाद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना रोख पारितोषिक, मानचिन्ह आणि मानपत्र देण्यात येणार असून, भव्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण केले जाईल.
प्रत्येक मंडळाने आपला चित्ररथ वेळेत मिरवणूक मार्गावर आणावा, व्यसनांपासून दूर राहावे आणि परस्पर सन्मान राखत कोणताही संघर्ष टाळावा, असे आवाहन करण्यात आले. प्रशासनाकडून मदत कक्ष उभारण्यात येणार असून, त्याद्वारे मंडळांच्या समस्या सोडवण्यात येणार आहेत.


बेळगावची शिवजयंती ही देशात विशेष परंपरा असलेली असून, येथे सादर होणारे चित्ररथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनदर्शनाचे दर्शन घडवतात. त्यामुळे सर्व मंडळांनी सहकार्याची भावना ठेवून उत्सव यशस्वी करावा, असे मत साहित्यिक गुणवंत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच शिवप्रेमींनी पोशाख आणि वर्तनात सभ्यता राखावी, असेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीस अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस जे. बी. शहापूरकर, साहित्यिक गुणवंत पाटील, प्रसाद मोरे, रंजीत हवळणाचे, चेतन किल्लेकर, शिवम गंधवाले, अरुण पाटील, चंद्रकांत माळी, अनंत बामणे, बसवंत मुतकेकर यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते.





