बेळगाव लाईव्ह : मौंडी गुरुवार (Maundy Thursday) हा दिवस श्रद्धाळूंना येशू ख्रिस्ताच्या अपार प्रेम, नम्रता आणि सेवाभावाचा विचार करण्याचे आमंत्रण देतो, असे प्रतिपादन बिशप डेरिक फर्नांडिस यांनी केले.
येथील अवर लेडी ऑफ फातिमा कॅथेड्रलमध्ये आयोजित मौंडी गुरुवार प्रार्थना सेवेदरम्यान ते प्रवचन करत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, येशूंनी आपल्या शिष्यांचे पाय धुऊन दाखवलेली सेवा ही केवळ बाह्य कृती नसून अंतःकरण शुद्धी आणि आध्यात्मिक नवचैतन्याचे प्रतीक आहे. अनेकजण इतरांची सेवा करण्यास तयार असतात, मात्र स्वतःच्या आयुष्यात देवाची कृपा आणि उपचार स्वीकारण्यास संकोच करतात, असेही त्यांनी नमूद केले.
शहरातील सर्व चर्चमध्ये मौंडी गुरुवारानिमित्त विशेष प्रार्थना सेवा आयोजित करण्यात आल्या होत्या. पवित्र बायबलमधील प्रसंगानुसार, गुड फ्रायडेच्या आदल्या दिवशी येशूंनी आपल्या शिष्यांचे पाय धुतले होते. त्या परंपरेनुसार शहरातील विविध चर्चमधील धर्मगुरूंनी १२ जणांचे पाय धुऊन सेवाभावाचे प्रतीकात्मक दर्शन घडवले.
आपल्या प्रवचनात बिशप फर्नांडिस यांनी युकरिस्टच्या महत्त्वावरही प्रकाश टाकला. येशू आपल्या शरीर आणि रक्ताच्या स्वरूपात श्रद्धाळूंना आध्यात्मिक पोषण देत राहतात आणि नम्रता, करुणा व क्षमाशीलतेने इतरांची सेवा करण्याचे आवाहन करतात, असे त्यांनी सांगितले.
मौंडी गुरुवाराच्या प्रार्थना सेवेत विविध ख्रिश्चन पंथांतील श्रद्धाळूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गुड फ्रायडेच्या तयारीसाठी उशिरापर्यंत विशेष प्रार्थना आयोजित करण्यात आल्या होत्या.





