belgaum

एमडीएमएची विक्री करणारे 3 जण मार्केट पोलिसांच्या ताब्यात

0
622
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील जुन्या भाजी मार्केट जवळ सार्वजनिक ठिकाणी एमडीएमए या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तिघा जणांना काल मार्केट पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळील 20 हजार रुपये किमतीच्या एमडीएमएसह एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे विनोद तानाजी हेराजे (वय 35, रा. सिद्धेश्वर गल्ली, पिरनवाडी बेळगाव), ओम पुरुषोत्तम (वय 22, रा. कोनवाळ गल्ली बेळगाव) आणि कौशिक किरण मुतगेकर (वय 22,रा. महावीरनगर, पिरनवाडी बेळगाव) अशी आहेत. हे तिघेजण काल मंगळवारी बेळगाव शहरातील जुन्या भाजी मार्केट जवळ सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या स्वार्थासाठी एमडीएमए या अंमली पदार्थाची विक्री करत होते.

याबाबतची माहिती मिळताच मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल हावन्नवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून तिघाही आरोपींना रंगेहात पकडले. तसेच त्यांच्या जवळील 20 हजार रुपये किमतीचे 3.45 ग्रॅम एमडीएमए आणि 1 लाख रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 belgaum

पोलीस चौकशीत आरोपींनी आपल्याला सदर एमडीएमए आरोपी क्रमांक चार ऋतिक पाटील (रा. समर्थनगर बेळगाव) यांच्याकडून मिळाल्याचे सांगितले. त्यामुळे चौघाही आरोपींविरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

शहरात गांजा विक्री करणारे तिघे गजाआड

दुसऱ्या एका प्रकरणात काल मंगळवारी शहरातील भरतेश कॉलेज जवळ सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या स्वार्थासाठी गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तिघा जणांना मार्केट पोलिसांनी अटक केली. तसेच त्यांच्या जवळील 29 हजार 500 रुपये किमतीचा 1 किलो 190 ग्रॅम गांजा जप्त केला. अटक झालेले आरोपींची नावे राजू गंगाधर नाईक (वय 29 रा. रामतीर्थनगर बेळगाव), पृथ्वीराज आनंद कदम (वय 24, रा. गुडनट्टी रस्ता, दादबानट्टी यमकनमर्डी ता. हुक्केरी) आणि प्रेमनाथ उर्फ सुरज विठ्ठल कुंडेकर (रा. महाद्वार रोड, बेळगाव) अशी आहेत मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हुसेनसाब केरुर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपरोक्त अटकेची कारवाई केली.

पोलीस चौकशीत आरोपींनी आपण खानापूर येथील यशवंत फ्रान्सिस सौज व नौशाद सनदी यांच्याकडून गांजा आणला असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्व पाचही जणांविरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.