बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील हरसनवाडी येथील गवंडी कामगाराची मुलगी सबिना लोबो हिने बारावी वाणिज्य शाखेत ९८.३३ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. अत्यंत हलाखीची परिस्थिती आणि दुर्गम भागात राहूनही सबिनाने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गझलकार शंकर पाटील यांच्या ‘दगड-विटांचे काही थर झाले, मला वाटले माझे घर झाले’ या ओळींनुसार, गवंडी कामात आयुष्य वेचणाऱ्या लुईस लोबो यांच्या घरात आज त्यांच्या मुलीने यशाचे शिखर गाठले आहे.
खानापूर-जांबोटी रस्त्यावरील जंगलात वसलेल्या हरसनवाडीसारख्या लहान गावातून शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणींवर मात करत सबिनाने हे यश संपादन केले आहे. प्रवासाची अपुरी साधने आणि पावसाळ्यातील प्रतिकूल परिस्थिती अशा आव्हानांना तोंड देत तिने अभ्यास सुरू ठेवला.
आपल्या यशाबद्दल बोलताना सबिनाने सर्वांचे आभार मानले आहेत. पालकांचे पाठबळ आणि मार्गदर्शकांमुळेच हे यश शक्य झाल्याचे तिने सांगितले. प्राचार्य अरविंद पाटील, डॉ. राजेश्वरी नागराजू आणि सर्व शिक्षकांनी आपल्याला नेहमीच प्रोत्साहित केले. कौटुंबिक परिस्थिती नाजूक असतानाही महाविद्यालयाने दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे आपण हे यश मिळवू शकले, अशी प्रतिक्रिया सबिना लोबो हिने व्यक्त केली. यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न महत्त्वाचे असल्याचेही तिने आवर्जून नमूद केले.

मुलीच्या या यशामुळे वडील लुईस लोबो यांचे डोळे अभिमानाने पाणावले आहेत. गवंडी कामातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून मुलीला शिकवण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलले.
आता सबिनाचे चार्टर्ड अकाउंटंट (सीए) होण्याचे ध्येय असून, तिच्या या जिद्दीने संपूर्ण खानापूर तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे. आगामी काळात ही दुर्गम भागातील कन्या आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर यशाची नवी शिखरे सर करेल, तिच्या आजवरच्या प्रवासाला आणि पुढील यशासाठी टीम बेळगाव लाईव्ह कडून खूप साऱ्या शुभेच्छा..





