belgaum

डोंगरगावमधील उत्सवात आमदारांचा पारा चढला

0
1536
 belgaum

बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील डोंगरगाव येथे एका सार्वजनिक उत्सवादरम्यान विचारलेल्या प्रश्नामुळे संतापलेल्या आमदारांचा संयमाचा बांध सुटला. भर कार्यक्रमात एका व्यक्तीवर डाफरत त्यांनी थेट शिवीगाळ केल्याची घटना समोर आली असून, याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

डोंगरगावमध्ये आयोजित एका कार्यक्रमात उपस्थितांपैकी एका व्यक्तीने खानापूरच्या आमदारांना कोणत्यातरी मुद्द्यावरून जाब विचारला. हा प्रश्न विचारताच आमदार प्रचंड संतापले आणि त्यांनी संबंधित व्यक्तीला जाहीररीत्या दमदाटी करण्यास सुरुवात केली. “माझ्याऐवजी दुसऱ्या कोणत्या आमदारासमोर असे बोलला असता, तर शिरच्छेद केला असता,” अशा जहाल शब्दांत आमदारांनी आपला राग व्यक्त केला.

आमदारांचा राग इतक्यावरच थांबला नाही, तर त्यांनी संबंधित व्यक्तीला कार्यक्रम सोडून निघून जाण्यास बजावले. “बाहेर नाही गेला तर श्रीमुखात भडकवीन,” अशी धमकी देत ते थेट शिवीगाळ करण्यावर उतरल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. यावेळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून, आज दिवसभर हा व्हिडिओ तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

 belgaum
Vitthal halgekar

या वादावादीच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या काही समर्थकांनी आणि आयोजकांनी संबंधित व्यक्तीलाच धारेवर धरले. आमदारांचा अपमान केल्याबद्दल आयोजकांऐवजी त्या व्यक्तीवरच पोलिसांत तक्रार दाखल करू आणि ग्रामस्थांना जमा करू, अशाही धमक्या देण्यात आल्याचे समजते. मात्र, हा संपूर्ण वाद नेमका कोणत्या विषयावरून सुरू झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेबाबत सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून लोकप्रतिनिधींच्या अशा वागणुकीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची दुसरी बाजू काय आहे किंवा आमदारांनी नक्की कोणत्या कारणास्तव हे पाऊल उचलले, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा समोर आलेला नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.