बेळगाव लाईव्ह : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अवघ्या काही दिवसांवर आली असताना बेळगावमधील कसाई गल्ली परिसरातील दुरवस्थेने प्रशासनाच्या नियोजनाचे वाभाडे काढले आहेत. महापालिका प्रशासनाने या भागातील रस्ते आणि गटारींची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र जयंती तोंडावर आली असतानाही स्थिती जैसे थे असल्याने भीमसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त निघणारी मानाची भीमज्योती मिरवणूक कसाई गल्ली मार्गावरून मार्गस्थ होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांच्या बैठकीत १३ एप्रिलपर्यंत या भागातील पायाभूत सुविधांचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आता केवळ तीन दिवस उरले असतानाही अद्याप कामाचा श्रीगणेशा झाला नसल्याने प्रशासनाच्या उदासीनतेवर स्थानिकांनी ताशेरे ओढले आहेत.
परिसरातील गटारींचे काँक्रीटीकरण न झाल्याने सांडपाणी एकाच ठिकाणी साचून राहत असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यावरील डांबर उखडल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, रस्त्याच्या मधोमध असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची टीका बाबू पुजारी यांनी केली आहे.
अत्यंत वैभवात निघणाऱ्या भीमज्योती मिरवणुकीच्या मार्गावर खड्डे आणि सांडपाणी असल्याने मिरवणुकीत अडथळे येण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन युद्धपातळीवर स्वच्छता आणि रस्ते दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा जयंतीच्या दिवशी आम्हाला अशाच दुर्गंधीयुक्त वातावरणात मिरवणूक काढावी लागेल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.





