belgaum

निलजी मराठी शाळेचा शतक महोत्सव दोन दिवस भरगच्च कार्यक्रम

0
588
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील निलजी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेने शंभर वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला असून, या ऐतिहासिक क्षणानिमित्त रविवार, १२ एप्रिल आणि सोमवार, १३ एप्रिल २०२६ रोजी भव्य ‘शतक महोत्सव सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. १९२६ साली स्थापन झालेली ही शाळा यंदा शताब्दी साजरी करत असून संपूर्ण गाव या उत्सवासाठी सज्ज झाले आहे.

या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सोमवार, १३ एप्रिल रोजी होणारे उद्घाटन सत्र. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून बीड (महाराष्ट्र) येथील राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध वक्ते आणि ‘YEWS’ अभियानाचे समन्वयक राहुल गिरी उपस्थित राहणार आहेत. ‘युवा प्रेरणा’ या विषयावर ते उपस्थितांना मार्गदर्शन करतील. या उद्घाटन सोहळ्याला बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार जगदीश शेट्टर, महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, राज्यसभा सदस्य ईराण्णा कडाडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

रविवारी सकाळी ७:३० वाजता ‘प्रबोधन दिंडी’ काढण्यात येणार आहे. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि दानशूर देणगीदारांचा सत्कार होईल. सोमवारी सायंकाळी ७ वाजता ‘भूपाळी ते भैरवी’ हा हरवत चाललेल्या मराठी लोककलांचा रांगडा आविष्कार सादर केला जाणार आहे. यात भारुड, लावणी, गोंधळ, वासुदेव आणि पोतराज यांसारख्या कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे.

 belgaum

शाळा शतक महोत्सव समितीचे अध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, कार्याध्यक्ष ॲड. लक्ष्मण पाटील आणि सर्व सदस्यांनी या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली आहे.

निवृत्त शिक्षकांचा सत्कार आणि स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले असून, सर्व आजी-माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.