बेळगाव लाईव्ह: फोर्ट रोड परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पोलीस आयुक्त गुलाबराव बोरसे यांनी मंगळवारी (दि. 7 मार्च 2026) ऑटोमोबाईल व्यावसायिक व दुकानदारांची बैठक घेतली.
या बैठकीत पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत वाहतूक कोंडीची कारणे, पार्किंग व्यवस्थेतील अडचणी तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या याबाबत सविस्तर चर्चा केली. व्यापाऱ्यांकडूनही विविध सूचना मांडण्यात आल्या.
डीसीपी निरंजन देवराज उर्स, एसीपी निकम, नॉर्थ सीपीआय श्रीकांत तोटगी व हेड कॉन्स्टेबल अब्दुल नायक यांचीही या बैठकीस उपस्थिती होती.
बेळगाव ऑटोमोबाईल मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष शरद पाटील यांनी फोर्ट रोडवरील चारचाकी व दुचाकींच्या पार्किंगचा प्रश्न आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येकडे लक्ष वेधले.

बेळगाव शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी पोलीस विभागाने घेतलेल्या उपक्रमांचे त्यांनी स्वागत करत आयुक्तांचे आभार मानले.
या बैठकीत सुहास पाटील, हरीश मेहता, अमित दोशी, कमरुद्दीन सौदागर, राजन मोदी, इनायत किलेदार, इक्बाल कित्तूर, बाबू किरण, विशाल पाटील, श्याम धामणे यांसह अनेक व्यावसायिक सहभागी झाले होते.
व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत प्रशासनाकडून सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला.





