बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर माजी महापौरांनी तीव्र आक्षेप घेतला असून, महापालिकेच्या आर्थिक गैरकारभाराचे वाभाडे काढले आहेत. नियमावली धाब्यावर बसवून सुरू असलेल्या करवाढीमुळे सामान्य नागरिक भरडला जात असून, याविरोधात माजी लोकप्रतिनिधींनी एकजूट होऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माजी महापौर नागेश सातेरी यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली. शहराचा विकास होण्याऐजी केवळ काही लोकप्रतिनिधी आणि अधिकारीच ‘स्मार्ट’ झाले आहेत, असा टोला नागेश सातेरी यांनी लगावला. एकेकाळी करवसुलीत कर्नाटक राज्यात अव्वल असलेल्या बेळगाव पालिकेची अवस्था आता बिकट झाली असून, शासनाकडून आलेले ७५ कोटींचे अनुदान नेमके कुठे खर्च झाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
लोकप्रतिनिधींनी केवळ राजकारण न करता जनहिताला प्राधान्य द्यावे, असा सल्ला माजी महापौर शिवाजीराव सुंठकर यांनी दिला. जनतेची कामे प्रामाणिकपणे केल्यास लोक स्वतःहून तुमचा सत्कार करतील, असे मत शिवाजीराव सुंठकर यांनी व्यक्त केले.
माजी महापौर रमेश कुडची यांनी प्रशासकीय कायद्यांची आठवण करून दिली. १९७७ च्या नियमानुसार उपलब्ध निधीचा विचार करूनच अर्थसंकल्प मांडणे अपेक्षित असताना, केवळ कागदोपत्री आकडेवारी फुगवून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप रमेश कुडची यांनी केला. अधिकाऱ्यांनी केवळ सत्ताधाऱ्यांच्या तालावर न नाचता कायद्याने काम करावे, अशा शब्दांत त्यांनी सुनावले.

शहरातील नागरी सुविधांच्या दुरवस्थेवर बोट ठेवताना रमेश कुडची यांनी सांगितले की, पाच वर्षांतून एकदा होणारी करवाढ आता दरवर्षी लादली जात आहे. पथदिव्यांचा प्रश्न गंभीर असून कमांड कंट्रोल रूम केवळ नावापुरती उरली आहे. सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनावर वचक निर्माण केला नाही, तर माजी नगरसेवकांना लोकहितासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा रमेश कुडची यांनी दिला.
सध्या बेळगाव महापालिकेत विद्यमान नगरसेवकाकडून म्हणावे तेवढे प्रभावी काम होत नाही अधिकाऱ्यांचे वर्चस्व वाढले आहे यासाठी जर विद्यमान नगरसेवकांना मार्गदर्शनाची गरज लावल्यास माजी नगरसेवक पुढाकार घेतल्याने त्यांना बेळगाव शहराच्या विकासासाठी मार्गदर्शन करतील अशी वाई देखील माजी नगरसेवकांच्या वतीने यावेळी देण्यात आली. नरगुनकर भावे चौक परिसरात असलेले ब्लॅक स्पॉट दूर करण्याची गरज व्यक्त करत माजी नगरसेवक रणजीत चव्हाण पाटील यांनी सदाशिवनगर स्मशानभूमीत असलेले गॅरेज चा विषयावर देखील सविस्तर माहिती देत महापालिकेने दोन्ही विषयां कडे गंभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली.
या पत्रकार परिषदेला माजी महापौर एन बी निर्वाणी, मालोजीराव अष्टेकर, रेणू किल्लेकर, नेताजी जाधव, वंदना बेळगुंदकर, दीपक वाघेला, संजीव प्रभू शिवणगौडा पाटील , सुनील बाळेकुंद्री यांसह अनेक माजी महापौर आणि माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





