बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील लोंडा येथील चर्च गल्ली परिसरात ईस्टर सणानिमित्त फटाके उडवण्यावरून वाद निर्माण होऊन मारहाण झाल्याची घटना रविवारी (दि. 5 एप्रिल 2026) सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 113/2026 अन्वये विविध भादंवि कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष उर्फ पीटर जॉन्सन अरेकर (रा. चर्च गल्ली, लोंडा) व त्यांचा भाऊ रोबिन जॉन्सन अरेकर (वय 36) हे दोघेही ईस्टर सणानिमित्त आपल्या घरासमोरील रस्त्यावर फटाके उडवत होते. त्यावेळी जॉन्सन पुलामीन डिकोस्टा, विल्सन पुलामीन डिकोस्टा, नेल्सन पुलामीन डिकोस्टा, अझर कंजारी आणि विनोद भंडारी (सर्व रा. लोंडा, ता. खानापूर) हे घटनास्थळी आले.
फटाके उडवण्यावरून दोन्ही गटांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले असून, आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेत संतोष अरेकर यांच्या कपाळावर व डाव्या भुवईजवळ किरकोळ दुखापत झाली, तर रोबिन अरेकर यांच्या डोक्याला विटेने मारहाण केल्याने गंभीर दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तसेच, “पुन्हा फटाके उडवले तर ठार मारू,” अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती आर. एस. सपाटे या करत आहेत.





