belgaum

खानापूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा गैरवापर;

0
511
 belgaum

बेळगाव लाईव्ह : खानापूरमधील कवळे मठ आणि एका खाजगी कंपनी दरम्यान असलेल्या जमिनीच्या वादात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्नाटक दलित संघर्ष समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून तो वादग्रस्त फलक त्वरित हटवण्याची मागणी केली आहे.

खानापूर शहरातील कवळे मठ आणि पायोनियर कंपनी यांच्यात जमिनीवरून दिवाणी न्यायालयीन खटला सुरू आहे. या वादाच्या ठिकाणी एका त्रयस्थ व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा फलक बेकायदेशीरपणे लावला असून, या माध्यमातून महामानवाच्या नावाचा वापर करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा दलित नेत्यांनी केला आहे.

या संदर्भात १७ मार्च रोजी कवळे मठाचे शिवानंद सरस्वती स्वामीजी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली होती. हुबळी येथील एका व्यक्तीने वादग्रस्त जमिनीत बेकायदेशीरपणे शिरकाव करून तिथे बाबासाहेबांचा फलक लावला असून, यामुळे दोन समाजांतील सलोखा बिघडण्याची भीती स्वामीजींनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक दलित नेत्यांनी स्वामीजींची भेट घेऊन त्यांना समर्थन दिले असून बाहेरील व्यक्तीच्या या कृत्याचा निषेध केला आहे.

 belgaum

याप्रकरणी २४ मार्च रोजी खानापूर पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन तो वादग्रस्त फलक हटवण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने दलित संघर्ष समितीने नाराजी व्यक्त केली आहे. महामानवाच्या प्रतिमेचा अशा प्रकारे वादात वापर करणे चुकीचे असून यामुळे सामाजिक शांतता धोक्यात येऊ शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कोणत्याही जमिनीच्या वादात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा वापर करून दलित समाजाची दिशाभूल करणे चुकीचे आहे. प्रशासनाने तो अवैध फलक त्वरित हटवून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा दलित संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा लक्ष्मण मादार यांनी दिला आहे.

यावेळी शिवाजी मादार, रामचंद्र मादार यांच्यासह दलित नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.