बेळगाव लाईव्ह :गोमांस वाहतूक करणाऱ्याचे अपहरण करून जातीवाचक शिवीगाळ करण्याबरोबरच खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून कुसमळी, कर्ले व मुचंडी येथील एकुण 11 जणांची बेळगाव येथील तृतीय जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती सरिता कुमारी यांनी साक्षीदारातील विसंगतीमुळे निर्दोष मुक्तता केली आहे.
अनंत नागोजी सावंत, किरण मारुती देसाई, भैरू मारुती कल्लेहोळकर, बाबुराव रामचंद्र पाटील, पवन मारुती गायकवाड (सर्व रा. कुसमळी ता. खानापूर जि. बेळगाव) अमर मोहन तळवार, कल्लाप्पा चंगप्पा तारीहाळकर, श्रीधर चंगाप्पा मंडोळकर (तिघेही रा. कर्ले ता. जि. बेळगाव), गजानन अप्पाजी घसारी, निखिल सिद्धाप्पा माने, व संतोष फकीरा माने (तिघेही रा. मुचंडी ता. जि. बेळगाव) अशी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्रकरणाची माहिती अशी की, फिर्यादी बाळाप्पा यल्लाप्पा होळेकर (रा. वंटमुरी) व त्याचा साथीदार गुळूसाब इब्राहिम बेपारी हे दोघेजण गेल्या 26 ऑक्टोबर 2013 रोजी रात्री 10 वाजता वंटमुरी येथून गोव्याला गोमांस घेऊन जात होते. त्यावेळी रात्री 11:30 वाजता ते कुसमळी गावाजवळ आले असता दोघेही चहा पिण्यासाठी थांबले.
त्या ठिकाणी आलेल्या चार-पाच संशयित आरोपींनी फिर्यादीच्या टाटा 207 वाहनांमधून पाणी पडत असल्याचे पाहून संशयावरून वाहनाची तपासणी केली. त्यावेळी वाहनात गोमांस असल्याचे आढळून आल्यामुळे फिर्यादी बाळाप्पा याचे त्याच्याच 207 गाडीमधून अपहरण करून आरोपींनी त्याला कुसमळीच्या जंगलात नेले. त्यानंतर इतर आरोपींना बोलावून घेऊन फिर्यादीला चाकू, रॉड, लाठा-काठ्यांनी मारहाण करून गाडीतील गोमांस फेकून देण्याबरोबरच गाडीची तोडफोड केली.
याप्रकरणी फिर्यादी बाळाप्पा याच्या तक्रारीवरून खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलीस तपासानंतर न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सदर खटल्याची नुकतीच अंतिम सुनावणी होऊन बेळगाव तृतीय जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती सरिता कुमारी यांनी साक्षीदारातील विसंगतीमुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींच्यावतीने ॲड. प्रताप यादव, ॲड. उमेश बिडीकर, ॲड. बंटी कपाई व ॲड. स्वप्निल नाईक यांनी काम पाहिले.





