बेळगाव लाईव्ह : मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळातील पदाधिकारी निवडीवरून सुरू झालेले राजीनामा सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.
युवा समिती सीमा भागाचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या राजीनाम्यानंतर आता छत्रपती शिवाजीनगर भागाचे नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनीही शिवजयंती महामंडळाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
मंडोळकर यांनी आपले राजीनामा पत्र माध्यमांकडे प्रसिद्धीसाठी दिले असून, अध्यक्ष निवड प्रक्रियेवर त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. विषय पत्रिकेत कोणताही विषय नसताना, तसेच कोणतीही पूर्वकल्पना न देता अध्यक्षांची निवड करण्यात आली, ही परंपरेला व कार्यपद्धतीला न शोभणारी बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“बैठक पारंपरिक उत्सवाला साजेशी नव्हती.

मी या उत्सव समितीचा सदस्य आणि महापालिकेतील मराठी नगरसेवक म्हणून या प्रक्रियेचा निषेध करतो,” असे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे. तसेच, शिवजयंती उत्सव महामंडळाच्या कार्यकारिणीची पुनर्रचना न झाल्यास हा राजीनामा अंतिम समजावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या निवड प्रक्रियेवरून कार्यकर्त्यांमधील नाराजी दिवसेंदिवस वाढत असून, परिस्थिती शांत करण्यासाठी कार्यकारिणीची पुनर्रचना करण्याची मागणी जोर धरत आहे.





