belgaum

म्यूल खात्यांच्या जाळ्यात ग्रामीण युवक,

0
287
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील ग्रामीण भागात सायबर गुन्हेगारांचे जाळे पसरले असून, येळ्ळूर परिसरात लाखाचे आमिष दाखवून तरुणांना ‘म्यूल’ खात्यांच्या जाळ्यात ओढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर गुन्हेगारांना मदत करण्यासाठी बनावट खाती उघडून ती विकल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भाग्यनगरमधील किरण रामचंद्र मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेळगाव सायबर क्राईम पोलिसांनी येळ्ळूरमधील अमन निंगाप्पा पाटील, पवन धामणेकर आणि किरण पाटील या तिघांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. संशयितांनी तरुणांना गाठून बँक खाते उघडून दिल्यास त्यात एक लाख रुपये जमा करू आणि महिन्याला पाच हजार रुपये देऊ, असे आमिष दाखवले होते.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संशयितांनी गेल्या वर्षी ४ मार्च २०२५ रोजी अनेक तरुणांना बँकांमध्ये नेऊन त्यांची खाती उघडली. तरुणांकडून आधारकार्ड आणि पॅनकार्ड मिळवून ही खाती प्रत्यक्षात सायबर गुन्हेगारांच्या हवाली करण्यात आली. येळ्ळूर परिसरातील ५०० हून अधिक बँक खाती अशा प्रकारे सायबर गुन्हेगारांच्या बेकायदेशीर व्यवहारांसाठी वापरली जात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये अतुल कुंडेकर आणि दिनेश सुळगेकर यांसारख्या अन्य नागरिकांचीही कागदपत्रे मिळवून फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. पैशांच्या हव्यासापोटी ग्रामीण भागातील तरुण या सायबर गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

 belgaum

शहरातील सायबर क्राईम विभागात दोन दिवसांपूर्वी याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पोलीस सध्या सखोल तपास करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शोधण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून आपली कागदपत्रे किंवा बँक खात्याची माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा सूत्रधार शोधण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे. ५०० हून अधिक खात्यांचे हे जाळे नेमके कोठपर्यंत पसरले आहे आणि यामागे कोणती आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत आहे का, याचा शोध घेणे आवश्यक आहे. केवळ साखळीतील दुवे असलेल्या संशयितांना पकडून चालणार नाही, तर या रॅकेटचा मुख्य सूत्रधार शोधून काढण्याचे मोठे आव्हान सायबर क्राईम विभागासमोर उभे ठाकले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.