बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि उपनगरांमध्ये अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम राबवली असून, गेल्या दोन दिवसांत अवैध दारू विक्री आणि अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. बेळगाव पोलीस आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी ही कारवाई केली आहे.
हिरेबागेवाडी पोलिसांनी ५ एप्रिल रोजी रेणुका पेट्रोल पंपाजवळ छापा टाकून राजू बसप्पा बसन्नवर (३३, रा. के. के. कोप्प) याला ताब्यात घेतले. तो कोणत्याही परवान्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे दारूची विक्री करत असल्याचे आढळले. त्याच्याकडून विविध ब्रँडच्या व्हिस्कीची पाकिटे आणि गुन्ह्यात वापरलेली हिरो पॅशन प्रो दुचाकी जप्त करण्यात आली आहे. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात अबकारी कायद्यांतर्गत याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अमली पदार्थ विरोधी मोहिमेत खडेबाजार पोलिसांनी सरदार मैदानाजवळ अस्वाभाविक वर्तन करणाऱ्या कृतिक संजय बडिगा (२६, रा. गणाचारी गल्ली) याला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत त्याने अमली पदार्थाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. तसेच काकती पोलिसांनी आंबेवाडी गावात सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या श्रीनाथ रामचंद्र आंबेकर (२१) आणि सागर देवराज आंबेकर या दोघांना अटक केली आहे.
माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीतही ६ एप्रिल रोजी पीएसआय होन्नप्पा तलवार आणि पथकाने न्यू गांधी नगर येथे कारवाई केली. प्रणीत ईश्वर पुजारी (२१) हा तरुण अमली पदार्थाच्या प्रभावाखाली असल्याचे आढळल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.
या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीची पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्तांनी दखल घेतली आहे.





