बेळगाव लाईव्ह:श्रीराम सेना हिंदुस्तान, अनगोळ यांच्यातर्फे आयोजित एसआरएस चषक टी-20 लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत बालाजी स्पोर्ट्स संघाच्या माजी रणजीपटू मिलिंद चव्हाण याने आज 111 धावांचे दमदार शतक झळकवून नवा कीर्तिमान प्रस्थापित केला.
शहरातील एसकेई प्लॅटिनम ज्युबिली मैदानावर खेळविण्यात येत असलेल्या उपरोक्त स्पर्धेत मिलिंद चव्हाण यांने झळकवलेले हे सलग दुसरे शतक असून याद्वारे ‘वय फक्त एक आकडा आहे जिद्द आणि मेहनतच खरी ताकद आहे,’ हे सिद्ध केले आहे.
गेल्या रविवारी झालेल्या सामन्यात आपल्या संघाच्या विजया सिंहाचा वाटा उचलताना मिलिंद चव्हाण याने प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध 34 चेंडूत 109 धावा करून तुफानी शतक झळकवले होते.

त्यानंतर आज पुन्हा एकदा शानदार खेळी करताना त्याने 59 चेंडू मध्ये 111 भावांचे आक्रमक शतक झळकावत स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला.
या पद्धतीने सलग दोन शतके झळकावण्याद्वारे वयाच्या 50 व्या वर्षीही मिलिंद चव्हाण याने घडवलेल्या जबरदस्त फॉर्मची प्रशंसा होत असून त्याच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.





