बेळगाव लाईव्ह : ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ नाम फलक प्रकरणातील दोन खटल्यांची आज शनिवारी बेळगावच्या दुसऱ्या जेएमएफसी न्यायालयासमोर सुनावणी होऊन एका खटल्यात युक्तिवादासह आरोपींचे जबाब नोंदवून घेण्यात आले. दुसऱ्या प्रकरणात आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद झाला.
महाराष्ट्र राज्य नामफलकाशी संबंधित खटला क्र. 122/15 आणि 126/15 यांची सुनावणी आज शनिवारी न्यायालयासमोर झाली. त्यामध्ये खटला क्र. 122/15 मधील वकिलांमध्ये युक्तिवाद होऊन आरोपींचे जबाब नोंदवून घेण्यात आले. त्याचप्रमाणे वारंवार गैरहजर राहणाऱ्या प्रवीण मारुती धामणेकर या आरोपीला आज खटल्यातून वगळण्यात आले.

सदर खटल्यामध्ये एकूण 47 आरोपी होते, त्यापैकी तिघा जणांचे निधन झाले असून यापूर्वी 6 जणांना खटल्यातून वगळण्यात आले होते. त्यामुळे आजचा आरोपी धरता वगळण्यात आलेल्या आरोपींची संख्या 7 झाली आहे. परिणामी सदर खटल्यात आता 37 आरोपी शिल्लक आहेत.
आजच्या दुसऱ्या 126/15 क्रमांकाच्या खटल्यात आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. आता हा खटला निकालासाठी ठेवण्यात आला आहे.
या खटल्याची पुढील सुनावणी येत्या 7 एप्रिल 2026 रोजी होणार असून 122/15 क्रमांकाच्या खटल्याची सुनावणी 8 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. आरोपींच्या वतीने ॲड. श्यामसुंदर पत्तार ॲड. हेमराज बेंचन्नावर आणि ॲड. शाम पाटील कामकाज पाहत आहेत.





