बेळगाव लाईव्ह : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पहाटेपासून रस्त्यावर उतरून कर्तव्य बजावणाऱ्या महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याचा भरधाव टिपरच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी खानापूर रोडवर घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून, कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अक्का कोलकार असे मृत सफाई कर्मचाऱ्यांचे नाव असून त्या बेळगाव महापालिकेत कार्यरत होत्या. दररोजप्रमाणे शनिवारी पहाटे त्या शहर स्वच्छतेचे काम करत होत्या. याच वेळी खानापूरकडून बेळगाव शहराच्या दिशेने वेगाने येणाऱ्या टिपर वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, अक्का कोलकार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत भरधाव वाहनांवर नियंत्रण आणण्याची मागणी केली. कर्तव्य बजावत असताना एका निष्पाप कर्मचाऱ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र भावना उमटत आहेत.

दररोज शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्याची चर्चा या घटनेनंतर पुन्हा सुरू झाली आहे. विशेषतः पहाटेच्या वेळी वेगाने धावणाऱ्या जड वाहनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी नमूद केले.
या प्रकरणी बेळगाव दक्षिण वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.





