बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल व राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत गतवर्षीच्या तुलनेत यंदा या मार्च महिन्यात अनुक्रमे 5 टीएमसी व 1 फूट इतकी कमालीचे घट झाली आहे. परिणामी बेळगावकरांसमोर पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे.
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची क्षमता अर्धा टीएमसी आहे. मागील वर्षी 2465.35 फूट इतका पाणीसाठा असणाऱ्या राकसकोप जलाशयामध्ये सध्या 2464.30 फूट पाणीसाठा आहे, जो मागील वर्षाच्या मार्च महिन्याच्या तुलनेत यंदा 1.05 फूट कमी आहे.
हिडकल जलाशयाची क्षमता 51 टीएमसी असली तरी यंदा उन्हाळ्यामुळे या जलाशयाची पाणी पातळी झपाट्याने घटत आहे. सध्या हिडकल जलाशयात 51.121 टीएमसी पाणी साठा असून जो गतवर्षीच्या 26.041 टीएमसीच्या तुलनेत 4.12 टीएमसी इतका कमी आहे.
या दोन्ही जलाशयांच्या पाणी पातळीतील घट लक्षात घेता येत्या काळात बेळगाव शहरवासीयांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. त्याचप्रमाणे यंदा मान्सून लांबणीवर पडल्यास ऐन पावसाळ्यात बेळगावकरांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.





