belgaum

मनपातील संभाव्य ठरावावरून विजय देवणे यांचा इशारा

0
523
Vijay devne
 belgaum

बेळगाव लाईव्ह: शहरातील सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा पेट घेण्याची चिन्हे दिसत असून बेळगाव महानगरपालिकेत 2005 साली मंजूर झालेल्या मराठी ठरावाविरोधात नवा ठराव आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कन्नड संघटनांकडून वाढलेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर हा ठराव मांडला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होत असून यामुळे मराठी-कन्नड वाद पुन्हा तीव्र होण्याची भीती निर्माण झाली आहे.

दरम्यान, या संभाव्य ठरावाला ठाकरे गटाच्या शिवसेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. कोल्हापूर येथील शिवसेना नेते विजय देवणे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “कन्नड संघटनांच्या दबावाखाली येऊन जर मराठीविरोधी ठराव मंजूर केला गेला, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू. बेळगावातील मराठी भाषिकांच्या भावनांशी खेळ सहन केला जाणार नाही.”

बेळगाव महानगरपालिकेत सध्या भाजपची सत्ता असून महापौर व उपमहापौर हे कन्नड भाषिक आहेत. त्यामुळे महापौरांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कन्नड संघटनांनी महाजन आयोगाची अंमलबजावणी करून सीमाप्रश्न संपल्याचा ठराव मंजूर करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.

 belgaum

विशेष म्हणजे, 2005 साली बेळगाव महानगरपालिकेत “सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करण्यात यावा” असा ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आला होता. त्या ठरावाला विरोध म्हणूनच सध्या कन्नड संघटना आक्रमक झाल्या असून तो ठराव रद्द करण्याच्या दिशेने पावले उचलली जात असल्याचे संकेत आहेत.

या घडामोडींना महाराष्ट्र एकीकरण समितीनेही तीव्र विरोध दर्शवला आहे. मराठी भाषिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याचे सांगत समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेनेही याच भूमिकेला पाठिंबा देत, “महापौरांनी असा ठराव मंजूर करू नये, अन्यथा शहरात मोठा उद्रेक होऊ शकतो,” असा इशारा दिला आहे.

दरम्यान, या वादग्रस्त मुद्द्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात बेळगावमध्ये आंदोलनांची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेच्या बैठकीत काय निर्णय होतो आणि प्रशासन यावर कशी भूमिका घेते, याकडे आता संपूर्ण सीमाभागाचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.