बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (केएमएफ) २०२५-२६ या आर्थिक वर्षात १२ कोटी ५९ लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. संघाचे अध्यक्ष आणि आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली असून, संघाने ५१० कोटी रुपयांचा ऐतिहासिक टर्नओव्हर साध्य केल्याचे त्यांनी जाहीर केले.
या आर्थिक वर्षात संघाने विस्तार करताना १०० नवीन दूध उत्पादक सहकारी संस्था स्थापन केल्या असून, आता कार्यरत संस्थांची एकूण संख्या ६८५ झाली आहे. दूध संकलनातही मोठी प्रगती झाली असून, दररोज सरासरी २.५० लाख किलो दूध संकलित केले जात आहे. वर्षभरात एकूण ८.२० कोटी किलो दूध संकलित झाले असून, यामध्ये गायीच्या दुधाचे प्रमाण सर्वाधिक आहे.
राज्य सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३२ कोटी रुपयांचा प्रोत्साहन भत्ता वितरित करण्यात आला असून, साडेसात कोटी रुपये मिळणे अद्याप बाकी आहे, असे भालचंद्र जारकीहोळी यांनी सांगितले.

संघाने केवळ दूध संकलनच नव्हे, तर तूप, पनीर आणि पेढा यांसारख्या उपपदार्थांच्या उत्पादनातही मोठी वाढ नोंदवली आहे. बाजारपेठ विस्तारासाठी बेळगावसह गोवा आणि पुणे येथे ५५ फ्रँचायझी सुरू करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, आंध्र प्रदेशातील ‘अक्षर दासोह’ योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना दररोज २५ हजार लिटर दुधाचा पुरवठा बेळगाव संघातर्फे केला जात आहे.
आर्थिक व्यवहारांबाबत माहिती देताना भालचंद्र जारकीहोळी यांनी स्पष्ट केले की, संघाने शेतकऱ्यांना ३३१ कोटी रुपये अदा केले आहेत. तसेच, नफ्यातील हिस्सा म्हणून शेतकऱ्यांना चारा कटर, रबर मॅट आणि दूध काढणी यंत्रांसाठी सुमारे ७ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. संघाची ही प्रगती शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समर्पित असल्याचे भालचंद्र जारकीहोळी यांनी नमूद केले.





