बेळगाव लाईव्ह :
टिळकवाडी परिसरातील दोन लॉजमध्ये झालेल्या चोरी प्रकरणांचा टिळकवाडी पोलिसांनी यशस्वी छडा लावला असून या प्रकरणी संकेश्वर येथील एका महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्याकडून सुमारे ३२ लाख ८६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
दीपा महालिंग अवटगी (वय ३३), मूळ रहिवासी करिसिद्धेश्वर गल्ली, महालिंगपूर व सध्या एसडीव्हीएस कॉलेजसमोर, संकेश्वर येथे वास्तव्यास असलेली महिला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणातील तिचा साथीदार शिवानंद ऊर्फ विनोद शंकरय्या मठपती, रा. शंकरनगर, निपाणी रोड, संकेश्वर हा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

चोरीच्या घटनांनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींचा माग काढला. अटक करण्यात आलेल्या महिलेकडून सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण ३२.८६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई खडेबाजार विभागाचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी, उपनिरीक्षक विश्वनाथ घंटामठ, प्रभाकर डोळ्ळी, तसेच महेश पाटील, एस. एम. करलिंगन्नावर, नागेंद्र तळवार, सतीश गिरी, लाडजीसाब मुल्तानी, गंगव्वा पार्वती, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशिद आदींच्या पथकाने केली.पोलिस पुढील तपास करत आहेत.




