बेळगाव लाईव्ह : महागाईच्या चटक्यात होरपळणाऱ्या बेळगावच्या जनतेला आता महानगरपालिका प्रशासनाने मोठा आर्थिक दणका दिला आहे. महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत, मालमत्ता करात ३ टक्के वाढ करण्याचा वादग्रस्त ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. सत्ताधारी आणि विरोधी गटातील तीव्र संघर्षात अखेर प्रशासनाने करवाढीचा वरवंटा फिरवल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे.
सभेच्या कामकाजाला सुरुवात होताच सत्ताधारी गटनेते हनुमंत कोंगाळी यांनी मालमत्ता करात वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आणि सभागृहात एकच गदारोळ सुरू झाला. सत्ताधारी गटाने करवाढीचे समर्थन केले असले, तरी लोकप्रतिनिधींमध्ये यावरून दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. नामनिर्देशित सदस्य रमेश सोंटक्की यांनी ही करवाढ सध्याच्या परिस्थितीत लादू नये, अशी स्पष्ट भूमिका मांडली. मात्र, सत्ताधारी आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने सभागृहात खडाजंगी झाली.
विरोधी गटाचे सदस्य शाहीद खान पठाण यांनी या प्रस्तावाचा कडाडून विरोध केला. “जनतेवर आधीच करांचा बोजा असताना ही वाढ कशासाठी?” असा सवाल करत त्यांनी या विषयावर थेट मतदानाची मागणी लावून धरली. पठाण यांनी मांडलेल्या या आक्रमक भूमिकेला इतर विरोधी सदस्यांनीही पाठिंबा दिला, ज्यामुळे काही काळ सभेचे कामकाज विस्कळीत झाले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या या रणकंदनामुळे महानगरपालिकेची ही सभा चांगलीच गाजली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सभागृहातील तणावपूर्ण वातावरण पाहता, महापौर मंगेश पवार यांनी अखेर ३ टक्के मालमत्ता कर वाढीच्या ठरावावर अंतिम शिक्कामोर्तब केले. महापौरांच्या या संमतीमुळे आता बेळगावकरांच्या घरांच्या आणि दुकानांच्या मालमत्ता करात मोठी वाढ होणार आहे. एकीकडे नागरी सुविधांचा बोजवारा उडालेला असताना दुसरीकडे जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचा हा निर्णय सर्वसामान्यांसाठी क्लेशदायक ठरणार आहे.





