बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपुल परिसरातील वाढते अपघात लक्षात घेता येथील रस्त्यांवर आवश्यक ठिकाणी तातडीने स्पीडब्रेकर्स बसविणे किंवा वेगमर्यादा लागू करणे यासारख्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे.
टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपुल परिसरातील रस्त्यांवर अलीकडे वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे संबंधित रस्त्यांवर आवश्यक ठिकाणी गतिरोधक (स्पीडब्रेकर्स) बसविण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.
अनगोळचे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी याबाबत यापूर्वीच रहदारी पोलिसांना लेखी पत्र देऊन लक्ष वेधले होते. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष झाल्याची खंत व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनीही या भागात दररोज घडणारे अपघात पाहता सुमारे वीसएकदा रहदारी पोलीस विभाग आणि महापालिकेकडे लेखी स्वरूपात तक्रार करून स्पीडब्रेकर्सची मागणी केली आहे. तरीदेखील अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाण पुलाला जोडणाऱ्या दुपदरी रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यांवरील राहणारी लक्षात घेता पुलाजवळ आवश्यक ठिकाणी वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर्स बसवणे गरजेचे होते. तथापि तसे न घडल्यामुळे अलीकडे या परिसरात सातत्याने अपघात घडत आहेत.
अपघातांचे हे वाढते प्रमाण धारवाड-हुबळी शहरांप्रमाणे वेग मर्यादा लागू केल्यास कमी होऊ शकते, असे जाणकार नागरिकांचे मत आहे. तथापि दुर्दैवाने प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे या भागात अपघातांची मालिका सुरूच असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तातडीने स्पीडब्रेकर्स बसविणे किंवा वेगमर्यादा लागू करणे यासारख्या उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे.





