बेळगाव लाईव्ह : पुण्याच्या पै. सुबोध पाटील याने अवघ्या 5 व्या मिनिटाला घिस्सा डावावर हरियाणाच्या पै. हरीश कुमार याला चितपट करून श्री ब्रह्मलिंग कुस्तीगीर संघटना व निलजी ग्रामस्थांच्यावतीने निलजी येथे आयोजित कुस्ती मैदान जिंकले.
श्री ब्रह्मलिंग यात्रेनिमित्त काल शुक्रवारी उपरोक्त कुस्ती मैदान कुस्ती शौकिनांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे श्रीराम सेना हिंदुस्तानचे तालुका प्रमुख भरत पाटील, युवा नेता मृणाल हेब्बाळकर, मारुती नारायण पाटील, नागेश देसाई, किरण मारुती पाटील, भरमा पाटील, किरण शिंदोळकर आदींच्या हस्ते पै सुबोध पाटील (पुणे) आणि पै. हरीश कुमार (हरियाणा) यांच्यातील प्रथम क्रमांकाची कुस्ती लावण्यात आली. तुरळ पावसात सुरू झालेल्या या कुस्तीमध्ये पै. सुबोध पाटील याने प्रारंभापासूनच आक्रमक पवित्रा घेत 5 व्या मिनिटाला घिस्सा डावावर पै. हरीश कुमार याला अस्मान दाखवत निलजी कुस्ती मैदान मारले. कुस्ती मैदानातील दुसऱ्या क्रमांकाची पै कामेश (कंग्राळी) विरुद्ध पै सतीश मोरे यांच्यातील दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सुटली. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पै. प्रेम (कंग्राळी) याने प्रतिस्पर्धी पै. अक्षय चौगुले (कोल्हापूर) याला ढाक डावार चित केले. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत पै. सौरभ पाटकर याला एक चाकी डावावर चित करून पै. पृथ्वीराज पाटील हा मेंढ्याचा मानकरी ठरला. पाचव्या कुस्तीमध्ये पै. विनायक (येळ्ळूर) याने प्रतिस्पर्धी पै. आकाराम (कोल्हापूर) याला एक लांगी डावावर पराभूत केले. याव्यतिरिक्त या कुस्ती मैदानामध्ये महेश तीर्थकुंडे, भूमिपुत्र (मुतगा), श्रीकांत (शिंदोळी), श्रीनंद (निलजी), आरव (निट्टूर), प्रथमेश (गणेशपुर), संदीप (कडोली), भरत (मुतगा), स्वराज्य (मुचंडी), शिवम (कडोली), शुभम (कंग्राळी), आर्यन (मुतगा), ध्रुव (मन्निकेरी), सुनील पाटील या पैलवानांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर नेत्रदीपक विजय मिळवले.
प्रारंभी आखाड्याचे उद्घाटन व विविध देवदेवतांचे पूजन प्रमुख अतिथी मारुती नारायण पाटील, निंगाप्पा गोमान्नाचे, किरण शिंदोळकर, चंद्रकांत पाटील आदींच्या हस्ते झाले. कुस्ती मैदानासाठी पंच म्हणून बाळाराम पाटील, नवीन पाटील, अर्जुन पाटील, कलाप्पा पाटील, भाऊ पाटील, बाळू पाटील, कृष्णा अष्टेकर, मारुती पाटील व भरमा गोमान्नाचे यांनी काम पाहिले. सदर कुस्ती मैदानात सुमारे 50 हून अधिक लहान -मोठ्या चटकदार कुस्त्या होणार होत्या, परंतु पावसामुळे काही कुस्त्या रद्द झाल्यामुळे कुस्ती शौकिनांची निराशा झाली.





