बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील शहापूर येथील सराफ गल्लीचा मुख्य रस्ता गेल्या १३ ते १५ वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या भागातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
शहापूरमधील सराफ गल्ली हा एक महत्त्वाचा आणि रुंद रस्ता म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या १३ वर्षांत या रस्त्याचे डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करण्यात आलेले नाही. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा महापालिका अधिकाऱ्यांना निवेदने दिली आणि विचारणा केली, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सध्या या संपूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसाळ्यात आणि रात्रीच्या वेळी येथून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.
या रस्त्याच्या कामाबाबत प्रशासनाकडून गॅस पाईपलाईन आणि पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे कारण पुढे केले जात आहे. जोपर्यंत या पाईपलाईन्स घालण्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत रस्ता करता येणार नाही, अशी उत्तरे अधिकारी वर्गाकडून मिळत आहेत. या तांत्रिक कारणांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचा विकास थांबलेला आहे. या संदर्भात स्थानिक नगरसेवकांशी संपर्क साधला असता, त्यांनीही पाणीपुरवठ्याची पाईपलाईन टाकण्याचे काम शिल्लक असल्याचे कारण सांगितले. मात्र, एक-दोन वर्षांचे काम १३ वर्षे कसे रेंगाळते, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

“आमच्या गल्लीतील रस्ता गेल्या १३-१४ वर्षांपासून झाला नाही. प्रत्येक वेळी तक्रार करायला गेल्यावर गॅस पाईपलाईन किंवा पाण्याचे काम आहे, असे सांगून आम्हाला परत पाठवले जाते. आता रस्त्यावर चालणेही कठीण झाले आहे, प्रशासनाने आमचा अंत पाहू नये.” “शहापूरमधील हा महत्त्वाचा रस्ता असूनही प्रशासन याकडे लक्ष देत नाहीये. लोकप्रतिनिधी फक्त आश्वासने देतात पण कामाला मुहूर्त लागत नाही. रस्ता रुंद असूनही खड्ड्यांमुळे त्याचा काहीच उपयोग होत नाहीये, लवकर काम सुरू करावे हीच आमची मागणी आहे” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकाने दिली.
रस्त्याची अवस्था खराब असल्याने येथील व्यापारावरही परिणाम होत आहे. सराफ गल्ली हा रहदारीचा मार्ग असल्याने अनेक नागरिक या रस्त्याचा वापर करतात. मात्र, दुरवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेने आता पाईपलाईनचे कारण न देता किमान खड्डे भरून रस्ता वाहतुकीयोग्य करावा आणि कायमस्वरूपी रस्ते विकासकाम तातडीने हाती घ्यावे, अशी आग्रही मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.





