belgaum

कचऱ्याबाबत गावकऱ्यांचा पिरनवाडी पट्टन पंचायतीला मोर्चाचा इशारा

0
221
 belgaum

बेळगाव लाईव्ह : पिरनवाडी (ता. जि. बेळगाव) येथे तुंबलेल्या कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली असून त्यामुळे गावाच्या आरोग्य व सौंदर्याला धोका निर्माण झाला आहे. तेंव्हा कचरा गाड्या कार्यान्वित करून कचऱ्याची उचल करण्याद्वारे ही समस्या तात्काळ सोडवावी, अशी मागणी समस्त गावकऱ्यांनी केली आहे. तसेच येत्या सोमवारपर्यंत याची पूर्तता न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा पिरनवाडी पट्टन पंचायतीला दिला आहे.

पिरनवाडीवासियांनी नारायण मुचंडीकर यांच्यासह इतर प्रमुखांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणी वजा इशाऱ्याचे निवेदन आज सोमवारी सकाळी पिरनवाडी पट्टन पंचायतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केले. यावेळी कचऱ्याची वेळच्यावेळी उचल होत नसल्याने दिवसेंदिवस कशा प्रकारे पिरनवाडी गावात अस्वच्छता निर्माण होत आहे याबद्दल माहिती देण्यात आली.

आसपासच्या गावातील कचरा पिरनवाडी आणून टाकला जात असल्याची आणि वेळोवेळी साफसफाई होत नसल्याने गावातील गटारी सांडपाण्याने तुंबत असल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. तसेच कचऱ्याच्या समस्येचे येत्या सोमवार पूर्वी निवारण झाले नाही तर पट्टण पंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.

 belgaum

उपस्थितांनी केलेल्या तक्रारी व मागणीची नोंद घेऊन निवेदन स्वीकारण्याबरोबरच पिरनवाडी पट्टन पंचायतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उद्भवलेल्या समस्येबद्दल लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करून समस्येचे निवारण केले जाईल असे आश्वासन दिले. निवेदन सादर करतेवेळी नारायण मुचंडीकर यांच्या समवेत रामनाथ मुचंडीकर, प्रमोद मुचंडीकर, मारुती पेडणेकर, जोतिबा चौगुले, रोहित चौगुले, सुयोग काढेमनी, प्रकाश मुचंडीकर, राजू पाटील आदींसह गावातील महिला वर्ग उपस्थित होता.

निवेदन सादर केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांना आपल्या मागणीबद्दल माहिती देताना नारायण मुचंडीकर यांनी सांगितले की, पिरनवाडी पट्टन पंचायतीकडे कचऱ्याच्या गाड्या असूनही गावातील कचऱ्याची उचलण्यासाठी त्यांचा वापर केला जात नाही. या वाहनांचा वापर तात्काळ सुरू करून गाव स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे कार्य ही येत्या सात दिवसात सुरू करावे अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा आम्ही दिला आहे.

दुसरी गंभीर बाब म्हणजे लोकशाही असलेल्या आपल्या देशातील आमच्या पिरनवाडी पट्टन पंचायतीमध्ये लोकनियुक्त सभागृह नाही. तब्बल आठ वर्षे झाली तरी आमच्या पट्टण पंचायतीची निवडणूक झालेली नाही. सरकारकडून आमच्या पंचायतीला मुबलक विकास निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र विकासाच्या बाबतीत इतर पट्टणपंचायतीच्या व्याप्तीतील गावांच्या तुलनेत आमचे गाव विकास व मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत पिछाडीवर आहे. शेजारील मच्छे पट्टण पंचायतीकडून कचऱ्याच्या गाड्या व्यवस्थित चालविल्या जातात, गाळ काढण्यासाठी जेसीबी, तसेच पाणी पुरवठ्यासाठी त्यांच्याकडे पाण्याचे टँकर आहेत.

पिरनवाडी पट्टन पंचायत कचरा गाड्यांचा वापर करत नसल्यामुळे खुल्या जागेत कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे अशी माहिती देऊन आपल्या भागातील कचऱ्याची उचल होत नसेल तर नागरिकांनी आपला कचरा थेट पट्टणपंचायतीच्या आवारात आणून टाकावा, असे आवाहन नारायण मुचंडीकर यांनी केले. तसेच येत्या सोमवार पर्यंत पंचायतीने कचरा गाड्यांचा वापर करून गावातील कचऱ्याची उचल करण्यास सुरुवात केली नाही तर पंचायतीवर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.