belgaum

मराठी नगरसेवकांनी भूमिका स्पष्ट करावी – शुभम शेळके

0
490
SHubham shelke yuva samiti
 belgaum

बेळगाव लाईव्ह :
जाहीर व्हिडिओच्या माध्यमातून म. ए. युवा समितीचे नेते शुभम शेळके यांनी कन्नड संघटनांवर जोरदार टीका करत, बेळगाव महानगरपालिकेत महाजन अहवाल अंतिम मानण्याच्या ठरावाच्या हालचालींना विरोध दर्शवला आहे. या ठरावाद्वारे मराठी अस्मितेवर घाव घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.


शेळके म्हणाले की, 2005 साली सीमाप्रश्न सोडवण्यासाठी झालेल्या ठरावाच्या विरोधात आता नवीन ठराव आणण्याची भाषा केली जात आहे. कन्नड संघटनांनी यासंदर्भात नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांना निवेदनही दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने हिंदुत्वाच्या अजेंड्यावर सत्ता मिळवली असताना, आज त्याच पक्षाकडून मराठी भाषिकांच्या हिताला तडा जात असल्याचे चित्र दिसत असल्याची टीका त्यांनी केली.

1958 पासून महापालिकेवर भगवा ध्वज फडकत असताना, नवी इमारत उभारून तो डावलण्याचा प्रयत्न झाला आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने लाल-पिवळा ध्वज फडकवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

 belgaum


महिलादिनी भगवा ध्वज फडकवण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिलांशी गैरवर्तन झाल्याचा उल्लेख करत, आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याचीही त्यांनी खंत व्यक्त केली.
नुकत्याच झालेल्या महापौर-उपमहापौर निवडीनंतर सभागृहात लाल-पिवळ्या फेट्यांचा वापर झाल्याचे सांगत, त्यात मराठी नगरसेवकांचाही समावेश असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

“राष्ट्रीय पक्षातून निवडून आलेले मराठी नगरसेवक मराठी प्रश्नावर ठाम भूमिका घेत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे,” असे ते म्हणाले.
कन्नड संघटनांच्या प्रतिनिधींनी 58 पैकी 55 नगरसेवक आपल्या बाजूचे असल्याचा दावा करत ठराव मंजूर करण्याची मागणी केली असल्याचे सांगत, काँग्रेस व भाजपमधील मराठी नगरसेवकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन शेळके यांनी केले.


महाजन अहवालाच्या ठरावाला “लोकशाही मूल्यांची हत्या” असे संबोधत, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तीन नगरसेवकांनी ठाम विरोधाची भूमिका घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला. “पद गेले तरी हा ठराव मान्य करणार नाही,” अशी भूमिका समितीच्या नगरसेवकांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले.


शेवटी, बेळगावातील मराठी जनतेने भविष्यात मतदान करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा, तसेच मराठी भाषिक नगरसेवकांनी आपल्या मातृभाषेचा अभिमान जपावा, असे आवाहन शुभम शेळके यांनी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.