बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील शहापूर येथील नवी गल्लीत रमजाननिमित्त आयोजित इफ्तार कूट सर्वधर्मसमभावाचे प्रतीक ठरले. येथील जुम्मा मशिदीत हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत एकात्मतेचा संदेश देत सामाजिक सलोख्याची नवी उंची गाठली.
शहापूरमधील नवी गल्ली येथील जुम्मा मशिदीत भारतनगर यंग कमिटी आणि पंच कमिटीच्या वतीने सलोखा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या भागात गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू आणि मुस्लिम बांधव एकमेकांच्या सणांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची परंपरा जोपासत आहेत. रमजानच्या इफ्तारमध्ये हिंदू बांधव आणि गणेशोत्सवात मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याने, संपूर्ण बेळगाव शहरासाठी नवी गल्ली एक आदर्श उदाहरण ठरल्याची भावना आयोजक व स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली.
नवी गल्लीतील हिंदू-मुस्लिम बांधव गेल्या अनेक वर्षांपासून सर्व सण एकत्र साजरे करतात. दरवर्षी इफ्तार कूटमध्ये हिंदू बांधवांचा आणि गणेशोत्सवात मुस्लिम बांधवांचा सहभाग असतो, ज्यामुळे सर्व जाती-धर्माचे सण सलोख्याने साजरे होतात, असे नगरसेवक रवी साळुंखे यांनी म्हटले.तर मनपाचे नामनिर्देशित सदस्य रमेश सोनटक्के बोलताना म्हणाले, नवी गल्लीत दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू-मुस्लिम बांधवांनी मिळून इफ्तारचे आयोजन केले असून, दोन्ही धर्मांचे सण आम्ही एकोप्याने साजरे करतो, हीच येथील परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधी आणि दोन्ही धर्मांचे बांधव दरवर्षी या इफ्तार सोहळ्यात सहभागी होतात. गेल्या अनेक वर्षांपासून कोणताही भेदभाव न ठेवता आम्ही एकमेकांच्या सणांत सहभागी होऊन सामाजिक सलोखा जपतो, असे माजी महापौर नेताजी जाधव यांनी म्हटले. तर रमजाननिमित्त नवी गल्लीतील जामिया मशिदीच्या वतीने दरवर्षी जातीय सलोखा जपला जातो. या इफ्तारच्या माध्यमातून संपूर्ण बेळगावला एक आदर्श संदेश दिला जात असल्याचे महादेव पाटील यांनी सांगितले.
शहापूर येथील जुम्मा मशिदीत भारतनगर यंग कमिटी आणि पंच कमिटीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला नगरसेवकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल सादिक कोतवाल यांनी आभार मानले. या सोहळ्यात शहापूरचे सीपीआय सिमानी, माजी महापौर नेताजी जाधव, नगरसेवक रवी साळुंखे, रमेश सोन् टक्के यांच्यासह अमजद मोमीन, अब्दुल बागलकोट, सादिक कोतवाल, झाकीर कणबर्गी, महादेव पाटील आणि सतीश पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शहापूरमधील नवी गल्लीने पुन्हा एकदा आपल्या कृतीतून सामाजिक सलोख्याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. सण कोणताही असो, तो एकत्र साजरा करण्याची ही परंपरा केवळ शहरासाठीच नव्हे, तर संपूर्ण राज्यासाठी एक दीपस्तंभ ठरत आहे.





